Maharashtra Politics: २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी (Lok Sabha Election 2024) भाजपसह अनेक पक्षांनी आतापासूनच तयारी करायला सुरुवात केली आहे. भाजपने तर खास रणनीति आखली असून, याचाच एक भाग म्हणून केंद्रीय मंत्र्यांनी देशभरातील विविध भागांमध्ये दौरे करत आहेत. मात्र, पंतप्रधान असलेल्या नरेंद्र मोदी यांच्याविरोधात २०२४ मध्ये विरोधकांकडून कोण असेल, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी काँग्रेसच्या सहभागावरून सूचक विधान केले.
२०२४ च्या निवडणुकीत भाजपाला आव्हान देण्यासाठी विरोधकांची एकी करण्यासाठी अनेक नेते प्रयत्न करत आहेत. एनडीएतून बाहेर पडल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे प्रमुख नितीशकुमार यांनी विरोधकांची एकजूट करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यातच शरद पवार यांनीही विरोधकांची एकजूट घडण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यातच शरद पवार यांना विरोधकांच्या एकजुटीबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर शरद पवारांनी अतिशय स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली.
२०२४ मध्ये विरोधी पक्ष एकत्रित लढेल का?
देशभरातील विरोधी पक्ष २०२४ मध्ये एकत्रित लढेल का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना, एकत्रित काहीतरी करावं अशी सर्वांची इच्छा आहे. मात्र अद्याप यासंबंधी काही नियोजन करण्यात आलेले नाही. नितीशकुमार, ममता बॅनर्जी यांनी माझी भेट घेत मते मांडली आहेत. मात्र अद्याप त्यांचे निर्णयात रुपांतर झालेले नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. तसेच काँग्रेसला सोबत घेऊ नये असे काहींचे म्हणणे आहे. पण मला वाटते, कोणी कोणाला सोबत घेऊ नये ही भूमिका घेऊ नये, असे शरद पवार यांनी नमूद केले.
दरम्यान, नाना पटोले यांनी काँग्रेस स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढणार असल्याचे जाही केल्यासंबंधी विचारले असता, आमच्या शुभेच्छा आहेत असे शरद पवार म्हणाले. तसेच कारण नसताना संजय राऊत यांना तुरुंगात टाकले आहे आणि आम्ही वाऱ्यावर सोडले असे बोलत आहेत. हा सत्तेचा गैरवापर आहे. अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय राऊत यांना विनाकारण जेलमध्ये टाकले आहे, असा दावा शरद पवारांनी केला.