पुणे: सरकार गेल्यानं काही जण अस्वस्थ आहेत. सत्ता गेल्यानं वाईट वाटणं स्वाभाविक आहे. पण सत्ता येत जात असते. सत्ता गेल्यानं इतकं अस्वस्थ होण्याचं कारण नाही, असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी भाजपला टोला लगावला. राज्यातील कायदा, सुव्यवस्था बिघडली असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. राष्ट्रपती राजवटीची भाषा केली जात आहे. त्यावर पवारांनी भाष्य केलं. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
सत्ता गेल्यानं अस्वस्थ होण्याचं कारण नाही. मी अनेकदा सत्ता गमावली आहे. मात्र त्यामुळे कधीही अस्वस्थ झालो नाही, असं पवार म्हणाले. यावेळी त्यांनी १९८० मध्ये पुलोद सरकार बरखास्त झाल्याची आठवण झाली. १९७८ मध्ये राज्यात पुलोदचं सरकार होतं. १९८० मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींच्या शिफारशीनंतर पुलोद सरकार बरखास्त करण्यात आलं. मात्र मी अस्वस्थ झालो नाही, अशी आठवण पवारांनी सांगितली.
सरकार बरखास्त करण्यात आल्याची माहिती मला मुख्य सचिवांकडून समजली. त्यानंतर मी माझ्या काही मित्रांना निवासस्थानी बोलवून घेतलं. सामानाची आवराआवर, बांधाबांध केली आणि दुसऱ्या ठिकाणी राहायला गेलो. तेव्हा वानखेडेवर भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामना सुरू होता. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान सोडल्यावर मी कसोटी सामना पाहायला मैदानावर गेलो होतो, असं पवारांनी सांगितलं.
हनुमान चालिसा वादावर काय म्हणाले पवार?प्रत्येकानं आपल्या धार्मिक भावना स्वत:पर्यंत मर्यादित ठेवाव्यात. धर्माबद्दल असलेल्या भावनांचं प्रदर्शन नको, असं शरद पवारांनी म्हटलं. मशिदीवरील भोंग्यांच्या प्रश्वावरून तोडगा काढण्यासाठी ठाकरे सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. सर्वांनी निर्णय घेऊन सामोपचारानं प्रश्न निकाली निघाल्यास उत्तमच होईल, असं पवार पुढे म्हणाले.