शरद पवारांचं शेवटचं इलेक्शन अन् आयोगाचा निर्णय; अजित पवारांची मिमिक्री करत आव्हाडांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 01:47 PM2024-02-07T13:47:07+5:302024-02-07T13:48:54+5:30

जितेंद्र आव्हाड यांनी काल अजित पवार यांचा उल्लेख सूर्याजी पिसाळ असा केल्यानंतर आज त्यांची मिमिक्री करत हल्लाबोल केला आहे.

ncp chief Sharad Pawars last election and election commissions decision Ajit Pawars mimicry by jitendra awhad | शरद पवारांचं शेवटचं इलेक्शन अन् आयोगाचा निर्णय; अजित पवारांची मिमिक्री करत आव्हाडांचा घणाघात

शरद पवारांचं शेवटचं इलेक्शन अन् आयोगाचा निर्णय; अजित पवारांची मिमिक्री करत आव्हाडांचा घणाघात

Jitendra Awhad Vs Ajit Pawar ( Marathi News ) : निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काल आपला निकाल देत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट हाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं जाहीर केलं. निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते चांगलेच आक्रमक झाले असून अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर टोकदार शब्दांत निशाणा साधला जात आहे. शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काल अजित पवार यांचा उल्लेख सूर्याजी पिसाळ असा केल्यानंतर आज त्यांची मिमिक्री करत हल्लाबोल केला आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्णयावर बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, "हा संपूर्ण निर्णय शरद पवारांना संपवण्यासाठी घेण्यात आला आहे. मात्र त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या भावना किती दुखावल्या आहेत, याची कल्पना निवडणूक आयोगाला नाही. ८४ वर्षांच्या माणसाला संपवण्यासाठी इतकी मोठी राजकीय खर्च करणं, त्यांना मरणासन्न यातना देणं, हे अजित पवार आणि त्यांच्यासोबतच्या लोकांना शोभत नाही," असा घणाघात आव्हाड यांनी केला. तसंच अजित पवार यांची मिमिक्री करत आव्हाड म्हणाले की, "यांचं कधी शेवटचं इलेक्शन होतंय मलाच माहीत नाही. पुढचं इलेक्शन शेवटचं होतंय की हेच शेवटचं इलेक्शन होतंय, हे मलाच माहीत नाही, असं म्हणणारे अजित पवार हे शरद पवारांच्या मरणाचीच वाट पाहत आहे," अशा शब्दांत आव्हाड यांनी अजित पवारांचा समाचार घेतला.

अजित पवारांनी बारामतीतील त्या वक्तव्यावर काय खुलासा केला होता?

बारामतीत केलेल्या वक्तव्यावर खुलासा करताना अजित पवार म्हणाले होते की, "काल माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे. माझं पहिल्यापासून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असल्यापासून एवढंच म्हणणं होतं की, ज्येष्ठ नेत्यांनी शारीरिक दगदगीचा विचार करावा आणि प्रकृतीची काळजी घ्यावी. हे मत मी पूर्वी देखील मांडलेलं आहे. मात्र काही लोक स्वतःच्या राजकारणासाठी ज्येष्ठ नेत्यांचा वापर करू पाहतात. त्यांना या गोष्टी कळणार नाहीत. माझ्या त्यांच्याबद्दलच्या भावना मी वेळोवेळी मांडलेल्या आहेत. पण काही लोकांना 'ध' चा 'मा' करायची सवयच असते, अशा नाटकीबाज लोकांना मी महत्त्व देत नाही. मात्र सर्वसामान्य लोकांना माझ्या भावना कळाव्यात, म्हणून मी हे म्हणणं मांडत आहे," अशी पोस्ट अजित पवार यांनी त्यांच्या 'एक्स' हँडलवर लिहिली होती.

राष्ट्रवादीबाबत निर्णय देताना निवडणूक आयोगाने नेमकं काय म्हटलं?

- अजित पवारांचा पक्ष हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
- पक्षाचं नाव आणि चिन्ह वापरण्याची अजित पवारांना परवानगी
- शरद पवार गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता
- महाराष्ट्रातले ४१ आणि नागालँडमधील ७ आमदार अजित पवारांच्या बाजूने आहेत.
- लोकसभेचे २ खासदार अजित पवारांच्या बाजूने आहेत. 
- एका खासदाराने दोन्ही बाजूंनी प्रमाणपत्र दिलं. 
- महाराष्ट्रातल्या ५ आमदारांनी दोन्ही बाजूंनी प्रमाणपत्र दिलं. 
- राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाने चिन्हा आणि पक्षाचं नाव सुचवावं. 
- ७ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत पर्याय न दिल्यास अपक्ष म्हणून मान्यता मिळेल. 
- राष्ट्रवादीत पक्षांतर्गत निवडणुका लोकशाही मार्गाने झाल्या नाहीत. 

Web Title: ncp chief Sharad Pawars last election and election commissions decision Ajit Pawars mimicry by jitendra awhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.