Maharashtra Political Crisis: भारतीय जनता पक्षाने संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीत फेरबदल केले. या पुनर्रचनेत भाजपने माजी अध्यक्ष, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना वगळले आहे. त्याचवेळी निवडणूक समितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संधी देत भाजपाने त्यांना पदोन्नती दिली आहे. यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू होताना दिसत आहेत. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही भाजपवर टीका केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी ट्वीट केले असून, नितीन गडकरी यांचा भाजपच्या संसदीय मंडळात समावेश न होणे एक चतुर राजकारणी म्हणून त्यांचा दर्जा खूप वाढला असल्याचे दर्शवत असल्याचे म्हटले आहे. नितीन गडकरी यांना वगळण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून, अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
...म्हणून भाजप तुमचे महत्त्व कमी करतेय
जेव्हा तुमचे कौशल्य व क्षमता वाढतात, आणि तुम्ही नेतृत्वासमोर आव्हान उभे करता तेव्हा भाजप तुमचे महत्व कमी करते, अशी टीका त्यांनी केली आहे. तसेच कलंकित झालेल्यांना पदोन्नती दिली जाते असा टोलाही लगावण्यात आला आहे. तत्पूर्वी, भाजप संसदीय मंडळ आणि निवडणूक समितीची पुनर्रचना करताना माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यासह मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना वगळण्यात आले आहे. गडकरी यांच्याऐवजी पक्षाने राज्यातून देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक समितीत स्थान दिले आहे. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग आणि अमित शाह यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.
दरम्यान, भाजपच्या संसदीय मंडळात काही नवीन नावांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा, सुधा यादव, इक्बाल सिंग लालपूरा, सर्बानंद सोनेवाल, के लक्ष्मण आणि सत्यनारायण जातिया यांचा समावेश आहे.