मुंबई - राज्यात भाजपा आणि शिवसेनेचा शिंदे गट यांनी एकत्र येत सत्तास्थापन केली आहे. या सर्व घडामोडीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राज्याचे मुख्यमंत्री असतील मी मंत्रिमंडळात सहभागी नसेन असं विधान देवेंद्र फडणवीस (BJP Devendra Fadnavis) यांनी केले होते. त्यानंतर काही तासातच भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने फडणवीसांच्या निर्णयाला बदलून त्यांना मंत्रिमंडळात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हा निर्णय देवेंद्र फडणवीसांना कळवण्यात आला. यानंतर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. याच दरम्यान आता राष्ट्रवादीने काँग्रेसने "क्या इस कहानी मे ट्विस्ट बाकी है?" असं म्हणत शिंदे सरकारला खोचक टोला लगावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते क्लाईड क्रास्टो यांनी भाजपा का गप्प आहे? असा सवाल विचारला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. "अडीच वर्ष कटकारस्थान केली आणि महाराष्ट्रातले #MVA सरकार पडले, नंतर त्याग देखील केला आणि मुख्यमंत्रीपद सोडले. एवढे सर्व करून सुद्धा मंत्र्यांची कार्यकारिणी अजून जाहीर झाली नाही. भाजपा का गप्प आहे? सुप्रीम कोर्टाच्या निकालाची वाट बघत आहे का? "क्या इस कहानी मे ट्विस्ट बाकी है?"" असं क्लाईड क्रास्टो यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
क्रास्टो यांनी दीपक केसरकरांवर देखील जोरदार निशाणा साधला आहे. "आदरणीय शरद पवार साहेबांवर टीका करून फुकट प्रसिद्धी मिळवणार्यांच्या यादीमध्ये दीपक केसरकर यांचे नाव जोडले गेले आहे. केसरकर मोठ्या मंत्रिपदाच्या आशेने स्वतःची प्रसिद्धी करत आहेत. पडळकर व सदाभाऊ खोत हे देखील टीका करतात पण त्याचा फायदा होत नाही हे केसरकर यांनी लक्षात ठेवावे" असं देखील क्लाईड क्रास्टो यांनी म्हटलं आहे.
"केसरकर सध्या तुम्ही हवेत आहात, उगाच आम्हाला तोंड उघडायला लावू नका, हवेतून खाली या"
राष्ट्रवादीने आता केसरकरांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "केसरकर सध्या तुम्ही हवेत आहात, उगाच आम्हाला तोंड उघडायला लावू नका, हवेतून खाली या" असं म्हणत जोरदार निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (NCP Amol Mitkari) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "केसरकर साहेब सध्या तुम्ही हवेत आहात. पवार साहेबांवर बोलल्याने प्रसिध्दी मिळते हे तुम्ही जाणून आहात. तुमची अजितदादांसमोर असणारी केविलवाणी अवस्था मी अनेकदा पहिली आहे. उगाच आम्हाला तोंड उघडायला लावू नका. हवेतून खाली या. तसेही तुमची बडबड जास्त दिवस चालणार नाही" असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.