पिंपरी : महापालिकेतील सत्ता अबाधित ठेवण्यासाठी सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसशी आघाडी करण्याचे संकेत दिले आहेत. यासाठी गणेशोत्सव आरतीचे औचित्य दोन्ही पक्षांच्या शहराध्यक्षांनी प्राथमिक सकारात्मक चर्चा केली. आघाडीचा निर्णय पक्षश्रेष्ठीच्या कोर्टात टाकला.महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात अनेक घडामोडी घडून येत आहेत. चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी शहराध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर राष्ट्रवादीला सुरुंग लावण्यास सुरुवात केली आहे. तसेच राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि भोसरीचे अपक्ष आमदार महेश लांडगे यांनाही भाजपात घेण्याचा विचार आहे. या संदर्भातील हालाचाली सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीनेही प्रत्युत्तर देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची एकमुखी सत्ता आहे. जातीयवादी पक्षांना दूर ठेवण्यासाठी काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद देऊन सत्तेत सहभागी करून घेतले आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शह देण्याचा प्रयत्न भाजपाने सुरू केला आहे. महापालिका पातळीवर भाजपाने शिवसेनेशी युती करण्याची भूमिका घेतली आहे. याविषयी प्राथमिक चर्चाही केली आहे. शिवसेनेशी युती करण्याचा प्रस्ताव भाजपाने ठेवला आहे. मात्र, युतीचा निर्णय दोन्ही पक्षांनी पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात टाकला आहे.शिवसेना आणि भाजपाने युतीची भूमिका घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनेही युतीबाबत प्राथमिक बोलणी सुरू केली आहेत. समविचारी पक्षांमधील मतविभागणी टाळण्यासाठी काँग्रेसबरोबर आघाडी करण्यासही ते अनुकूल असल्याचे दिसून येत आहे. त्याचाच भाग म्हणून दोन्ही शहराध्यक्षांनी भेटून प्राथमिक चर्चा केली. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी गणेशोत्सवातील आरतीच्या निमित्ताने काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांना पिंपरीगावातील निवासस्थानी आमंत्रित केले होते. या वेळी महापालिका निवडणुकीविषयी दोन्ही शहराध्यक्षांमध्ये चर्चा झाली. युतीबाबतच्या सकारात्मक चर्चेविषयीच्या वृत्तास वाघेरे आणि साठे यांनी दुजोरा दिला आहे. दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेतेच या संदर्भातील अंतिम निर्णय घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)>राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे दोन्ही समविचारी पक्ष आहेत. दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते सकारात्मक चर्चा करून पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत आघाडी करण्याबाबत अंतिम निर्णय घेतील. - संजोग वाघेरे, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस>पिंपरी-चिंचवडच्या सर्वांगीण विकासात फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचाच वाटा आहे. भाजपा-शिवसेनेचे शहरासाठी काहीही योगदान नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते चर्चा करून आघाडीबाबत योग्य तो निर्णय घेतील. - सचिन साठे, शहराध्यक्ष काँग्रेस
राष्ट्रवादी-काँग्रेस युती?
By admin | Published: September 18, 2016 1:03 AM