ठाणे : विधान परिषद निवडणुकीत बविआने राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याने घोडेबाजाराला ऊत आला असताना एकही मत फुटू नये म्हणून आता राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनाही गोव्यात अज्ञातस्थळी पाठवले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेत मात्र गोवा की महाबळेश्वर, यावर एकमत न झाल्याने पक्षाच्या नगरसेवकांना ऐनवेळेस ठाण्याच्या आसपासच्या रिसॉर्टवर नेण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.अपक्ष, मनसे, रिपाइं आणि इतर पक्षांतील नगरसेवकांचे भाव वधारले आहेत. मतदानाच्या दिवशी दगाफटका होऊ नये म्हणून राष्ट्रवादीने ही रणनीती आखली आहे. मतदारसंघातील सर्वच नगरसेवकांना आता या टूरचा लाभ होणार असून, ते ३ जून रोजीच मतदानाला हजर राहणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली. सेनेने आधी महाबळेश्वरवर शिक्कामोर्तब केले होते. परंतु, आता पुन्हा गोवा चर्चेत आहे. यापूर्वीच्या निवडणुकांमध्येदेखील शिवसेना अशा प्रकारची खेळी खेळत आली आहे. सुरुवातीला लांबचे ठिकाण सांगायचे आणि ऐनवेळी आजूबाजूच्याच ठिकाणी नगरसेवकांना ठेवायचे, ही शिवसेनेची नेहमीचीच रणनीती वापरली जाण्याची चिन्हे आहेत. भाव वधारला : एकेका मताला लाखोंचे महत्त्व प्राप्त झाले आहे. राष्ट्रवादीकडून सध्या सुमारे तीन लाखांची आॅफर दिली जात असल्याची आणि शिवसेनेकडून तीन ते पाच लाखांची आॅफर दिली जात असल्याची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे. काही मतदारांनी तर दोन्ही बाजूंची आॅफर स्वीकारल्याची चर्चादेखील सुरू आहे.
राष्ट्रवादीचे नगरसेवक गोवा टूरला!
By admin | Published: May 28, 2016 1:32 AM