ठाणे : इकबाल कासकरच्या खंडणीवसुलीच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचा सहभाग असल्याच्या बातम्या पोलीस अधिका-यांच्या हवाल्याने पेरण्यात आल्याने त्या पक्षाच्या नगरसेवकांमध्ये अस्वस्थता असून पक्षाचे सर्वच्या सर्व ३५ नगरसेवक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे येत्या काही दिवसांत आपले राजीनामे सोपवणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.एका बिल्डरकडून खंडणीवसुली केल्याच्या प्रकरणात कासकरला दोन दिवसांपूर्वी ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख प्रदीप शर्मा यांच्या पथकाने अटक केली. त्याच्या अटकेची घोषणा करण्याकरिता पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दोन ते चार नगरसेवक आणि बडे नेते कासकरला खंडणीवसुलीकरिता सहकार्य करत असल्याचा दावा केला. आयुक्तांनी कुठल्याही पक्षाचे थेट नाव घेतले नसले, तरी पोलिसांच्या हवाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस व कासकर कनेक्शनची चर्चा टीव्हीवर रंगवण्यात आली. लागलीच दुसºयाच दिवशी प्रदीप शर्मा यांनी ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेऊन चर्चा केली. हा नगरसेवकांवर दबाव टाकण्याचा प्रकार असल्याचे त्यांचे मत आहे.त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आयुक्तांची भेट घेतली असता आपण तुमच्याबाबत संशय व्यक्त केलेला नाही, असा खुलासा त्यांनी केला. मात्र, राष्ट्रवादीचे नगरसेवक अस्वस्थ असून राजकीय हेतूने केल्या जाणाºया बदनामीविरुद्ध राजीनाम्याचे अस्त्र वापरण्याच्या तयारीत आहेत.>बोलण्यावर पाळत ठेवण्याची भीतीबिल्डर सुरज परमार आत्महत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे नगरसेवक तुरुंगात गेले. त्या वेळी पोलिसांनी पालिकेत येऊन महासभेच्या कामकाजाची पाहणी केली. कोणता नगरसेवक काय बोलतो, कुणाबद्दल बोलतो, याकडे पोलिसांचे लक्ष असल्याचे जाहीर केले. कासकर प्रकरणानंतर तसाच काहीसा प्रयत्न केला जाण्याची भीती नगरसेवकांना वाटते.