मी जे बोलतोय ते खोटे असलं तर राजकारणातून निवृत्त होईन; अजित पवारांचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 10:50 AM2023-09-11T10:50:12+5:302023-09-11T10:50:50+5:30
आम्ही कुठल्या दबावाला भीक घालणारी माणसे नाही, आम्हीही मराठ्यांची औलाद आहे, आम्ही शेतकऱ्यांची मुले आहोत. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे बदनामी करण्याचे काम सुरू आहे असा आरोप अजित पवारांनी केला.
कोल्हापूर – शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील मतभेदामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २ गट पडलेत. सध्या या दोन्ही गटाकडून विविध दावे करण्यात येत आहेत. अजित पवार हे आमचे नेते असल्याचं प्रफुल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्याकडून म्हटलं आहे. त्याचसोबत राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्हावर दावा केला आहे. शरद पवार गटाकडूनही शरद पवारच पक्षाचे अध्यक्ष असल्याचे सांगण्यात येते. हा वाद सध्या निवडणूक आयोगाकडे आहे. त्यात रविवारी अजितदादांची कोल्हापूरात जाहीर सभा झाली. त्यावेळी त्यांनी शरद पवार गटावर निशाणा साधला.
अजित पवार म्हणाले की, उद्धव ठाकरेंचे सरकार पडत होते, त्याचवेळेस राष्ट्रवादीच्या १-२ आमदार वगळता सर्व मंत्री, आमदारांनी एक पत्र तयार केले होते. या पत्रात आपण महायुतीत सामील व्हावं असं म्हटलं होते. हे खोटे असले तर राजकारणातून निवृत्त होईल आणि हे खरे असले तर जे खोटे बोलतायेत त्यांनी राजकारणातून निवृत्त झाले पाहिजे. आहे का तयारी? काहीजण म्हणतात आमच्यावर दबाव होता, होय, आमच्यावर लोकांची कामे करण्याचा दबाव होता. आमदारांच्या मतदारसंघात रखडलेली कामे, विकासकामांना मिळालेली स्थगिती ती उठवण्याचा दबाव होता असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत आम्ही कुठल्या दबावाला भीक घालणारी माणसे नाही, आम्हीही मराठ्यांची औलाद आहे, आम्ही शेतकऱ्यांची मुले आहोत. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे बदनामी करण्याचे काम सुरू आहे. त्यात कुठलेही तथ्य नाही. मी जे बोलतो ते खरे बोलतो आणि वस्तूस्थितीला धरून बोलतो हे महाराष्ट्राला माहिती आहे. स्वार्थासाठी आम्ही महायुतीत आलो नाही. आम्ही सत्तेत ही कामे करायला आलोय असंही अजित पवार यांनी म्हटलं.
दरम्यान, शहर वाढताना अनेक गावे शहरात घ्यावी लागतात. कोल्हापूरकर टोलमाफीसाठी मजबूतीने पुढे आले. राज्य सरकारला वाकवलं त्याबद्दल तुमचे अभिनंदन, तुमच्या मनात येते ते तुम्ही करून दाखवता. परंतु पुढील ५० वर्षानंतरचं कोल्हापूर डोळ्यासमोर आणा, पुढच्या पिढीचं भविष्य बघा, जवळची गावे तातडीने शहरात घेतली नाहीत तर शहरे बकाल होतात. पुण्यातील धनकवडी बघा, प्लॅनिंग न होता इमारती उभ्या राहिल्या. आपण राजकारण न आणता त्यामध्ये एकोपा दाखवा. ज्या ज्या गोष्टी त्या त्या वेळी झाल्या तरच त्याचा फायदा होतो. फार उशीर केला तर त्याला अर्थ राहत नाही त्यामुळे सर्वांना हात जोडून विनंती आहे. कोल्हापूरकरांनी या कामात मदत करावी. विकासाच्या कामाला निधी द्यायला आम्ही कमी पडणार नाही असा शब्द अजित पवारांनी कोल्हापूरच्या सभेत दिला.