देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. महागाईने सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. याच दरम्यान आता लोकांना आणखी एक मोठा फटका बसला आहे. सिलिंडरच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ झाली असून १५ दिवसांत तब्बल ५० रुपयांनी महागला आहे. दरम्यान, १ सप्टेंबर रोजी गॅस सिलिंडरच्या दरात २५ रूपयांची वाढ करण्यात आली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपवर टीकेचा बाण सोडला आहे. "युपीए सरकारच्या काळात एक रुपयांनी पेट्रोल- डिझेल महाग झाले तर तांडव करणारे भाजप आता मूग गिळून गप्प का?," असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.
"मोदी सरकारच्या काळात पेट्रोल - डिझेल व गॅस दरवाढ भरमसाठ झाली आहे. केंद्र सरकारने पेट्रोलवर एक्साईज ड्युटी दीडशे टक्क्यांनी वाढवली आहे. मात्र युपीए सरकारमध्ये आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाची किंमत सर्वाधिक असताना देखील माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्यांच्या कुशल आर्थिक धोरणामुळे पेट्रोल डिझेल व गॅसची किंमत कमी ठेवली होती," असं तपासे म्हणाले.
"महाराष्ट्रात आता गॅसवर सबसिडी मिळणं बंद झालं आहे. पेट्रोल डिझेलने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. जवळपास सहा महिन्यात १९० रुपयांची दरवाढ ही फक्त गॅस सिलेंडरमध्ये झाली आहे. भाजपने स्वतःची नैतिकता विसरुन भांडवलशाहीचे राजकारण देशात सुरू केले आहे," असाही त्यांनी यावेळी केला आहे.
१५ दिवसांत ५० रूपयांची वाढ१५ दिवसांत विना सब्सिडी एलपीजी सिलिंडर ५० रुपयांनी महागला आहे. १ सप्टेंबर रोजी एलपीजी सिलिंडरमध्ये २५ रुपयांची वाढ झाली आहे. याआधी पेट्रोलियम कंपन्यानी १८ ऑगस्ट रोजी गॅस सिलिंडरच्या किमतीत २५ रुपयांची वाढ केली होती. दिल्लीमध्ये आता १४.२ किलोग्रॅमच्या विना सब्सिडी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत २५ रुपयांनी वाढली आहे. या वाढीनंतर दिल्लीत १४.२ किलोग्रॅमच्या सिलिंडरचा दर ८८४.५० रुपये इतका झाला आहे.