Ajit Pawar And Devendra Fadnavis: गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्रीपदावरून बरीच उलट-सुलट चर्चा असल्याचे दिसत आहे. सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्ष असो भावी मुख्यमंत्री म्हणून अनेकांचे बॅनर झळकल्याचे पाहायला मिळाले. अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदावरून राष्ट्रवादीतील नेते विधाने करत असताना खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक वक्तव्य केले होते. यानंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावरून चर्चा सुरू झाल्या. यातच आता अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदावरून केलेल्या विधानावरून तर्क-वितर्क लावले जात आहेत.
अजित पवार यांनी सत्तापक्षाला समर्थन दिल्यापासून तेच मुख्यमंत्री होतील, अशा चर्चा सुरु आहेत. प्रत्येकवेळी एखादी तारीख चर्चिली जाते पण पुढे काही होत नाही. मागच्या काही दिवसांपासून भाजप, शिवसेना आणि अजित पवार गटाच्या समर्थकांकडून मुख्यमंत्री पदाबाबत जाहीरपणे भाष्य केले जात आहे. यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, असे विधान केले होते. यासंदर्भात अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर...
मीडियाशी बोलताना अजित पवार म्हणाले की, चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय बोलावे, हा त्यांचा अधिकार आहे. शेवटी जनताच निर्णय घेत असते. आम्हाला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाले तर वाईट वाटण्याचे कारण नाही, असे अजित पवारांनी सांगितले. या विधानामुळे खरेच देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाला अजित पवारांचे समर्थन आहे का? याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, भाजपविरोधात जे सोबत येतील त्यांना घेऊन इंडिया आघाडी लढणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना आमची तीन पक्षांची आघाडी आहे. शेतकरी कामगार पक्षासारखे काही आणखी पक्षही येतील. तसेच अजित पवार मुख्यमंत्री होणे हे स्वप्नच राहणार आहे. घरवापसी नाहीच, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.