NCP DCM Ajit Pawar News: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरे, बैठका, सभा यांचे सत्र सुरू आहे. यातच मराठा आरक्षण प्रकरणी मनोज जरांगे पाटील आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. यावरून राज ठाकरे यांनी मांडलेल्या भूमिकेवर विरोधक टीका करताना दिसत आहेत. यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यांवर हल्ले झाल्याचे पाहायला मिळाले. या घडामोडींवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.
राज ठाकरे दौऱ्यावर आहेत. यावेळी मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेल्या भूमिकेनंतर राज ठाकरे यांच्या ताफ्यावर सुपारी फेकत हल्ला करण्यात आला. यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच यामागे ठाकरे गटातील पदाधिकारी सामील असल्याचा दावा करत, माझ्या नादी लागू नका. माझे मोहोळ उठले तर तुम्हाला सभा घेणे कठीण होईल, असा इशारा दिला. यानंतर काहीच तासांत ठाण्यातील सभेसाठी जात असताना उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर मनसैनिकांनी नारळ, बांगड्या, शेण फेकत तीव्र प्रतिक्रिया दिली. ठाकरे गट आणि मनसैनिक भिडल्याचेही दिसले. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट भाष्य केले.
त्या चुका ताबडतोब थांबवल्याच पाहिजेत
अशा पद्धतीने महाराष्ट्रात मागे कधीच असे घडले नव्हते. हे महाराष्ट्राचे नावलौकिक खराब करणारे आहे. सर्व राजकीय पक्षांनी, सत्ताधारी, विरोधकांनी बोध घेतला पाहिजे. ज्या ज्या पक्षाच्या नेतृत्वाकडून किंवा कार्यकर्त्यांकडून चुका होत आहेत. त्या चुका ताबडतोब थांबवल्याच पाहिजेत, असे अजित पवार म्हणाले. दुसरीकडे, खरी सुरुवात ही राज ठाकरे यांच्या दौऱ्यामध्ये झाली. मराठवाड्यात राज ठाकरेंचा ताफा अडवला गेला. त्याच अॅक्शनला आज रिअॅक्शन दिल्याचे पाहायला मिळाले, परंतु, असे आंदोलन कोणालाच अपेक्षित नसते, असे सूचक विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
दरम्यान, आम्ही बाळासाहेब यांचे विचार कधीही सोडले नाहीत. सत्तेसाठी कुठलेही कॉम्प्रमाईज आम्ही विचारांशी करणार नाही. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये स्ट्राईकरेट पाहिला तर लोकांची पसंती कोणाला आहेत ते पाहावे. ठाण्यातल्या लोकांना बरोबर औषध द्यायला सांगतो. आधी दिल्लीतील लोक मातोश्रीमध्ये यायची आणि हे लोक आता मातोश्री सोडून दिल्लीला लोटांगण घालत आहेत. बाळासाहेब ठाकरे असताना त्यांनी अशा प्रकारचे काम केले असते तर बाळासाहेबांनी त्यांना जंगलात फोटोग्राफी करण्यासाठी पाठवले असते, असा खोचक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लगावला.