Ajit Pawar Reaction On Yogi Adityanath Statement: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आळंदीत एका कार्यक्रमासाठी हजेरी लावली होती. यावेळी बोलताना योगी आदित्यनाथ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानांवरून आता टीका केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह यावरून काका-पुतण्यात संघर्ष सुरू असला तरी या मुद्द्यावर शरद पवार आणि अजित पवार यांचे एकमत झाल्याचे पाहायला मिळत आहे. शरद पवार यांच्यानंतर अजित पवार यांनी योगी आदित्यनाथ यांना सुनावल्याचे सांगितले जात आहे.
पावन आळंदी भूमीत येण्याचे भाग्य लाभले. सनातन धर्मासाठी काम करत आलो आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या भूमीपुढे नतमस्तक आहे. लहान वयात ज्ञानेश्वर महाराज यांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी वाचली, तेव्हापासून आळंदीत यायची इच्छा होती. ती पूर्ण झाली. महाराष्ट्रात एकाच कुटुंबात चार संत होऊन गेले. त्यांचा आशीर्वाद आपल्याला शेकडो वर्षांपासून मिळतो आहे. याच महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांना रामदास स्वामी यांनी घडवले. महाराष्ट्र ही शौर्य आणि पराक्रमाची भूमी आहे. कारण इथे संतांचे सान्निध्य आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले होते. यावरून अजित पवार यांनी टीका केली.
राजमाता जिजाऊ यांनी शिवाजी महाराजांना घडविले
राजमाता जिजाऊ यांनी शिवाजी महाराजांना घडविले. त्याच शिवरायांच्या गुरु आणि मार्गदर्शक होत्या, त्यांनी महाराजांना प्रेरणा दिली. याच प्रेरणेतून स्वराज्य स्थापन करायचे या ध्येयाने शिवरायांनी मावळ्यांचे सैन्य उभे करुन स्वराज्याची उभारणी केली, हा इतिहास आहे, या शब्दांत अजित पवार यांनी योगी आदित्यनाथ यांच्या विधानाचा समचार घेतला. स्वराज्य सप्ताह सुरू आहे. हिंदवी स्वराज्य स्थापना शिवाजी महाराज यांनी केली. रयतेचे राज्य स्थापन केले. समाजातील नवीन पिढीला माहिती होण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आपला इतिहास त्यांना कळावा हा आमचा हेतू आहे, असे अजित पवार म्हणाले.
दरम्यान, आमच्या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्त्वामध्ये राजमाता जिजाऊ यांचे योगदान आहे. जिजामाता यांनीच शिवाजी महाराजांच्या आयुष्याला दिशा दिली. जिजाऊंनी केलेले कर्तृत्त्व बाजुला सारुन त्याचे श्रेय आणखी कोणाला देण्याची भूमिका काही लोक घेत आहेत. शिवाजी महाराजांचे स्वत:चे कर्तृत्त्व आणि राजमाता जिजाऊंनी केलेले मार्गदर्शन यांमुळे सगळा इतिहास घडला, हे सगळ्या जगाला माहिती आहे, असे शरद पवार यांनी म्हटले.