Ajit Pawar News: लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या सातव्या टप्प्यातील मतदान ०१ जून रोजी होणार आहे. तर, ०४ जून रोजी मतमोजणी आहे. महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मिळणाऱ्या जागांबाबत विविध दावे केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी केलेल्या विधानानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेले वक्तव्य चर्चेत आले आहे. अजित पवार यांनी केलेल्या विधानावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.
देश कुठे चालला आहे? जग कुठे चालले आहे? आपण कुठे चाललो आहोत? आपण जातीपातीमध्ये अडकून बसतो आहोत. ज्यावेळी आपण महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा मानतो. त्यांचा आदर्श समोर ठेवून पुढे जातो. राज्यातील काही जिल्ह्यात जातीयवादावर निवडणूक झाली. मराठा आणि इतर समाज असे काही वातावरण गावात पाहायला मिळाले, असे अजित पवार यांनी म्हटले.
लोकसभा निवडणुकीत काय होईल हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही
आम्ही ज्यावेळी महाविकास आघाडीत एकत्र काम करायचो. तेव्हा आम्हाला सांगायचे की, शिवसेनेबाबत टोकाची भूमिका घ्या. काय कुठे कसे गणित बदले. लोकसभा निवडणुकीत काय होईल, हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. आगामी काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राजकीय पक्ष आतापासूनच विधानसभेच्या तयारीला लागल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत अजित पवार बोलत होते.
दरम्यान, मला आपल्याला सांगायचे आहे की, आधीच चारशे पार...चारशे पार ही घोषणा देण्यात आली आणि संविधान बदलणार हे दलित समाजाच्या मनावर इतके बिंबले की ते काढता काढता नाकी नऊ आले. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका टीव्ही मुलाखतीत १५ ते २० मिनिटे हेच सांगत होते की आम्ही संविधान बदलणार नाही, उलट संविधान दिन साजरा करणार आहोत. मात्र या सगळ्याचा परिणाम आपल्याला आताच्या निवडणुकीत जाणवला, अशी जाहीर कबुली छगन भुजबळ यांनी दिली.