NCP DCM Ajit Pawar News: मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. यानंतर राज ठाकरे यांच्या निर्णयाचे महायुतीतील नेत्यांकडून स्वागत करण्यात आले. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार टीका केली. राज ठाकरेंनी पाठिंबा जाहीर केल्यानंतर आता आमची ताकद वाढल्याचा विश्वास महायुतीमधील अनेक नेत्यांनी व्यक्त केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
मीडियाशी बोलताना अजित पवार यांनी महायुतीतील जागावाटपासह अन्य विषयांवर स्पष्ट शब्दांत सविस्तर भूमिका मांडली. विजय शिवतारेंनी वर्षा बंगल्यावर मी, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांसह बसलो होतो, तेव्हा त्यांच्या भागातले महत्त्वाचे विषय मांडले. सदर विषय सरकारनं मार्गी लावायला हवेत असे ते म्हणाले. त्याचवेळी त्यांनी सांगितले होते की, मी एक दिवस सभा आयोजित करतो. त्या सभेला मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी यावे. तेव्हा आम्ही तसा शब्द दिला होता. त्यानुसार त्यांनी ११ तारखेला सभा आयोजित केली आहे. त्या सभेला मुख्यमंत्री व मीही जाणार आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
महायुतीच्या जागावाटपाबाबत चर्चा करून योग्य मार्ग काढू
महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून योग्य मार्ग काढू. सातारा आणि नाशिकचे सगळे व्यवस्थित होईल. त्याबाबत काळजी करू नका. ती निवडणूक पुढच्या टप्प्यात आहे. त्याचे अर्ज भरण्यास अजून सुरुवात झालेली नाही. नाशिक किंवा कोकण येथील निवडणुकीचे अर्ज शेवटच्या टप्प्यात भरले जाणार आहेत. महाराष्ट्रातील पाचवा टप्पा हा शेवटचा टप्पा आहे. देशातील सातवा टप्पा शेवटचा आहे. त्यामुळे त्याला अजून विलंब आहे, असे अजित पवार म्हणाले.
दरम्यान, राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशभरातील काम पाहिले आहे. त्यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. महायुतीला याचा नक्कीच फायदा होईल. राज ठाकरेंचे नेतृत्व वेगळे आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.