“कुणीही ‘लाडकी बहीण’योजनेचे पैसे परत घेऊ शकत नाही”; अजित पवारांनी स्पष्टच सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 11:23 AM2024-08-16T11:23:12+5:302024-08-16T11:23:51+5:30
Ajit Pawar News: रवी राणा यांनी लाडकी बहीण योजनेबाबत केलेल्या विधानाचा समाचार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला.
Ajit Pawar News: पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारने 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' सुरू केली. या योजनेची राज्यभर जोरदार चर्चा सुरू आहे. विरोधकांनी या याजनेवरुन शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर आरोप केले आहेत. यातच अपक्ष आमदार रवी राणा यांनी या योजनेबाबत केलेल्या विधानावरून आता राजकीय वर्तुळात जोरदार प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावरून महायुतीवर टीकास्त्र सोडले. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे.
आमचे सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये हे आम्ही दुप्पट म्हणजेच ३००० करु, तर आता यासाठी तुमचा आशीर्वाद हवा आहे. पण, ज्यांनी मला आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ म्हणून १५०० रुपये वापस घेणार, असे वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केले होते. यानंतर या विधानावरून गदारोळ झाल्यानंतर रवी राणा यांनी सारवासारव केली होती. बहीण भावाचे नाते आपुलकीचे असले पाहिजे. जे गमतीने बोललो त्याचा विरोधक बाऊ करत आहे, असे रवी राणा यांनी म्हटले होते.
कुणीही ‘लाडकी बहीण’योजनेचे पैसे परत घेऊ शकत नाही
एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात भाष्य केले. माय माऊलींनो, कदाचित तुम्हाला कुणी सांगेल की बघा, त्यांना पैसे मिळाले, पण तुम्हाला मिळाले नाहीत. थोडा धीर धरा. आमच्या महायुतीतील काही महाभाग असे वक्तव्य करतात की बघा हा, आम्ही पैसे देणार आहोत, तर मग तुम्ही आम्हाला नाही काही (मत) दिले तर आम्ही (पैसे) परत घेऊ. मी माझ्या माय-माऊलींना सांगतो की, तुमच्या अकाऊंटला गेलेला पैसा परत घेऊ शकत नाही. महायुतीत कोणीही अशा पद्धतीने चुकीचे वक्तव्य करू नये, चुकीला माफी नाही, या शब्दांत अजित पवार यांनी समाचार घेतला.
दरम्यान, आमचे नेते गमती गमतीत बोलताना काहीही बोलतात, कुणीतरी म्हणते की, लाडकी बहीण योजनेचे पैस परत घेऊ. या देशामध्ये भाऊबीज कधीच परत घेतली जात नाही. एकदा भाऊबीज दिली की त्याच्या बदल्यात केवळ माया आणि मायाच मिळत असते. निवडणुका येतात – जातात. मला विश्वास आहे. बहिणींचा आशिर्वाद आमच्या पाठिशी असेल. आमचे त्रिमूर्तींचे सरकार सत्तेत आहे. तोपर्यंत बहिणींसाठीची ही योजना कुणीही बंद करू शकत नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.