अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2024 02:04 PM2024-05-05T14:04:01+5:302024-05-05T14:06:02+5:30

Jay Pawar Meet Manoj Jarange Patil: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांनी अचानक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.

ncp dcm ajit pawar son jay pawar meet manoj jarange patil | अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

Jay Pawar Meet Manoj Jarange Patil: लोकसभेच्या पुढील टप्प्यातील प्रचार संपण्यासाठी अवघे काही तास राहिले आहेत. त्यानंतर ०७ मे रोजी मतदान होणार आहे. यासाठी राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीकडून प्रचारावर मोठा भर दिला जात आहे. बाइक रॅली, प्रचारसभा यातून एकमेकांवर टीका करण्यात येत आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन मराठा आंदोलत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीचे कारण अद्याप गुलदस्त्यात असले तरी यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी अचानक जय पवार यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. जय पवार मुंबईतून हेलिकॉप्टरने थेट छत्रपती संभाजीनगरला पोहोचले. तेथून कारने अंतरवाली सराटी येथे पोहोचले. जय पवार यांनी अर्धा तास वाट पाहिल्यानंतर मनोज जरांगे यांच्याशी त्यांची भेट झाली. जय पवार यांनी ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे सांगितले. परंतु, या भेटीनंतर आता चर्चांना सुरुवात झाली आहे. 

मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे शिंदे-फडणवीस-पवार सरकारने एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावले आणि मराठा आरक्षणाच्यासंदर्भातील कायदा केला. मात्र, यानंतरही मनोज जरांगे यांनी सगेसोयरेसह अनेक मुद्द्यावरून नाराजी व्यक्त करत सरकारवर हल्लाबोल सुरूच ठेवला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तर सडकून टीका केली. काही मागण्यांसाठी ४ जूनचा अल्टिमेटम मनोज जरांगे यांनी दिला आहे. मनोज जरांगे राज्यात ठिकठिकाणी भेट देत असून, आपली भूमिका स्पष्ट करत आहेत. 

दरम्यान, महाविकास आघाडी आणि महायुती दोन्ही आमच्यासाठी सारखेच आहेत. मराठा समाजाने कुणालाही पाठिंबा जाहीर केलेला नाही. मराठा समाज सूज्ञ आहे. पाठिंबा देण्याऐवजी उमेदवार पाडायची भूमिका अधिक महत्त्वाची आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वी सांगितले होते. 
 

Web Title: ncp dcm ajit pawar son jay pawar meet manoj jarange patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.