Jay Ajit Pawar News: आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. यातच अनेक विषयांवरून महाविकास आघाडीचे नेते महायुती सरकारवर टीका करताना पाहायला मिळत आहेत. महायुतीतील नेतेही पलटवार करत आहेत. लोकसभेप्रमाणे विधानसभेत चित्र दिसावे, यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील असून, सत्ता कायम राखण्याचे आव्हान महायुतीसमोर आहे. यातच बारामतीमधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
बारामतीतून सात ते आठ वेळा निवडणूक लढली. आता तिथून निवडणूक लढवण्यात रस नाही, असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर आता जय पवार बारामती मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढणार का, अशी चर्चा सुरू झाली होती. पत्रकारांशी बोलताना जय पवार यांनी यासंदर्भात स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. बारामती विधानसभेसाठी इच्छुक आहात का? असा प्रश्न जय पवार यांना विचारण्यात आला असता त्यांनी सूचक विधान केले. उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळी ठरवतील तसे, असे जय पवार यांनी म्हटले आहे.
अजितदादांना मुख्यमंत्री बनवायचे आहे
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची राज्यभर जनसन्मान यात्रा सुरु आहे. जय पवार यांच्या नेतृत्वात बारामतीत मोठी रॅली काढण्यात आली. याबाबत बोलताना जय पवार म्हणाले की, यावेळेस रॅली चांगली झाली. जनसन्मान रॅलीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील वेळी पाऊस होता. मात्र आता सगळे कव्हर केले आहे. जनतेचा प्रतिसादही मागील वेळेपेक्षा चांगला आहे. सगळ्यांना अजितदादांना मुख्यमंत्री बनवायचे आहे. ही सगळ्यांची इच्छा आहे, असे जय पवार म्हणाले.
दरम्यान, माझी इच्छा ही अधीपासूनच सर्वांना मदत करण्याची आहे. अजित पवारांनी मतदारसंघात ज्या प्रकारे काम केले आहे. त्या प्रकारे लोकांचे कामे करायची आहेत. सर्व तरुणांचा पुढाकार आहे. सगळ्यांची इच्छा होती. युवक म्हणायचे की, दादा आता तुम्हीच नेक्स्ट. पण बघू. दादा आणि पक्षातील ज्येष्ठ नेते निर्णय घेतील, असे सांगत बारामती मतदारसंघातील उमेदवारीबाबत सकारात्मक विधान केले.