“जागावाटपाचे काम ९९ टक्के पूर्ण, महायुती एकत्रितपणे जागा जाहीर करणार”: अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 12:20 PM2024-03-27T12:20:12+5:302024-03-27T12:20:29+5:30
NCP DCM Ajit Pawar News: मनसेचा महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय अंतिम झाल्यास महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत राज ठाकरे दिसू शकतात, अशी चर्चा आहे.
NCP DCM Ajit Pawar News: २८ मार्चला मुंबईत महायुतीची एकत्रित पत्रकार परिषद घेऊन त्यावेळी कुणाला किती जागा मिळणार हे जाहीर केले जाईल. जागावाटपाचे आतापर्यंत ९९ टक्के काम पूर्ण झाले असून आमच्या कार्यकर्त्यांचे समाधान होईल अशा जागा आम्हाला मिळतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. तसेच रायगड लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची उमेदवारी घोषित करण्यात आली.
मीडियाशी बोलताना अजित पवार यांनी सांगितले की, पाच वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुका झाल्या, तेव्हा भाजपाच्या २३ जागा आल्या. शिवसेनेच्या १८ जागा आल्या, राष्ट्रवादी काँग्रेसला ४ जागा मिळाल्या. एक जागा नवनीत राणा यांची होती. त्यांना राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता. त्यामुळे आम्हाला फार कमी जागा मिळणार, अशा चर्चा करत माध्यमांमधून गैरसमज पसरवण्याचे काम करण्यात आले, अशी टीका अजित पवारांनी विरोधकांवर केली.
नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्राचे बळ पाठीशी उभे करू
राज्यातील लोकसभा प्रचारक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. अन्य स्टार प्रचारकांच्या नावावर चर्चा सुरू आहे. अशा पद्धतीने आम्ही लोकांसमोर जाणार असून, लोकांचा विश्वास आम्ही जिंकू आणि नरेंद्र मोदी यांना तिसर्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्राचे बळ त्यांच्या पाठीशी उभे करू, असा निर्धार व्यक्त करत, जाहीरनाम्यावर काम सुरू आहे. लवकरच तो दिला जाईल. स्थानिक प्रश्न जाहीरनाम्यात यावेत अशी भूमिका आहे, असे अजित पवारांनी स्पष्ट केले.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर झालेली प्रत्यक्ष चर्चा तसेच मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाजपाप्रणित महायुतीत सहभागी व्हायचे की नाही, याचा निर्णय लवकरच घेणार आहेत, असे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी शिवतीर्थ या निवासस्थानी मनसेच्या नेत्यांची बैठक बोलावल्याची माहिती देण्यात आली आहे. या बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. या बैठकीत महायुतीतील सहभागाबाबत निर्णय झाला तर महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत राज ठाकरे व्यासपीठावर दिसण्याची शक्यता आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.