मुंबई: राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याकडे एका महिलेने पाच कोटी रुपयांच्या खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यासंबंधित मलबार हिल पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर धनंजय मुंडेंना धमकी देणाऱ्या महिलेला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. रेणू शर्मा असे या महिलेचे नाव आहे. रेणू शर्मा यांना अटक झाल्यानंतर धनंजय मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
धनंजय मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या प्रकरणावर भाष्य केले आहे. गेल्या दीड-दोन वर्षांपासून हा त्रास सुरू आहे. यापूर्वी त्यांनी एक खोटी तक्रार माझ्याविरोधात केली होती. नंतर ती तक्रार परत घेतली. ज्या काही गोष्टी गेल्या दीड-दोन वर्षांत झाल्या, जे काही सहन करत होतो. सगळ्या गोष्टी सहनशक्तीच्या पलीकडे गेल्यानंतर शेवटी पोलिसांमध्ये ही तक्रार द्यावी लागली. तक्रार देताना पोलिसांना माझ्याकडून जे काही पुरावे द्यायचे, त्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आता यात जे काय करायचे ते पोलिसांना करायचे आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले.
धनंजय मुंडेंविरोधात बलात्कार केल्याचा आरोप
रेणू शर्मा या महिलेने मागील वर्षी जानेवारी महिन्यात धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्कार केल्याचा आरोप करत खळबळ माजवली होती, त्यानंतर काही दिवसातच तिने सदर तक्रार माघारी घेतली होती. तेव्हापासून रेणू शर्मा ही मेसेज, व्हॉट्स अॅप तसेच फोन करून पैशांची मागणी करत होती, यासंदर्भातील सर्व पुरावे पोलिसात दिले असल्याचेही धनंजय मुंडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. फेब्रुवारी आणि मार्चदरम्यान एका परिचित महिलेने धनंजय मुंडे यांना आंतरराष्ट्रीय नंबरवरून फोन करून खंडणीची मागणी केली. या महिलेने आपल्याकडे पाच कोटी रुपये आणि पाच कोटी रुपयांचे दुकान तसेच एक महागडे घड्याळ मागितल्याचे धनंजय मुंडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच ही मागणी पूर्ण न झाल्यास बलात्काराची तक्रार करण्याची तसेच सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी रेणू शर्माने दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, रेणू शर्मा ही महिला मूळ इंदोर मध्य प्रदेशातील असून ती करुणा शर्माची बहीण आहे. धनंजय मुंडे यांच्या तक्रारीनंतर मुंबई क्राईम ब्रांच आणि इंदोर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तिला अटक करून आधी इंदोर कोर्टात हजर केले, इंदोर कोर्टाने तिचा ताबा दिला आणि त्यानंतर सदर महिलेला पुढील चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.