परभणी: पाडवा मेळावा, ठाण्यातील उत्तर सभा आणि आता महाराष्ट्र दिनी औरंगाबाद येथे तिसरी सभा घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सभांचा धडाकाच लावला आहे. राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यातील पहिल्या सभेपासून मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा लावून धरला आहे. महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारला ३ मेपर्यंतचे अल्टिमेटम दिले असून, राज ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. यावरून राज ठाकरेंवर राजकीय वर्तुळातून मोठी टीका झाली. औरंगाबाद येथील सभेवरूनही राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी राज ठाकरे यांच्याकडून ईडीची पिडा टाळण्यााठी सगळा खटाटोप सुरू असून, औरंगाबादची सभा भाजप पुरस्कृत असल्याचा आरोप केला आहे.
राज ठाकरेंची सभा म्हणजे स्वत:चे काहीतरी झाकण्यासाठी आहे. आधी ते केंद्राविरोधात बोलायचे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांना देशाच्या राजकीय पटलावरुन हटवले पाहिजे, अशी मागणी करणारा माणूस आज त्यांचेच गुणगाण गातोय. म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. राज ठाकरे यांची सभा ही भाजप पुरस्कृत आहे, हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही, असे धनंजय मुंडे म्हणाले.
काहीही फरक पडणार नाही
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा भाजप पुरस्कृत आहे. ईडीची पिडा टाळण्यासाठी राज ठाकरे सभा घेऊन भाजपला खूश करत आहेत. आधी ते केंद्राविरोधात सभा घ्यायचे. आता ते महाविकास आघाडीविरोधात सभा घेत आहेत. त्याने काहीही फरक पडणार नाही. स्वत:चे काहीतरी झाकण्यासाठी अशा सभांचे आयोजन केले जात आहे, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली.