Maharashtra Politics: काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत गटबाजी सुरू असल्याचे समोर आले आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीपासून काँग्रेसमध्ये सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरुन गोंधळ सुरू झाला. याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. यातच महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या एका वक्तव्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी समर्थन केले आहे.
नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नसता, तर पुढचा पेच प्रसंग टाळता आला असता, असे संजय राऊत यांनी म्हटले. यावर बोलताना दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये या विषयावर चर्चा व्हायला हवी होती. वास्तविक नाना पटोले यांनी त्यावेळी अध्यक्ष पद सोडायला नको होते. त्यांनी जर अध्यक्षपद सोडले नसते तर हे सर्व घडले नसते. मात्र, आता यावर सार्वजनिक चर्चा करणे योग्य नाही. आमच्या पातळीवर आम्ही चर्चा करु. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांवर जास्त बोलू शकत नाही, असे दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले.
प्रज्ञा सातव यांच्यावरील हल्ला गंभीर
काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात दिलीप वळसे-पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. प्रज्ञा सातव यांच्यावरील हल्ला गंभीर आहे. पोलीस विभागाने अशा घटनांबाबत काळजी घेणे गरजेचे आहे, असे वळसे-पाटील म्हणाले. तसेच शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरही भाष्य करताना, सर्वप्रथम आमदारांच्या निलंबनावर निर्णय व्हायला हवा. न्यायालयात यावर ताबडतोब सुनावणी होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
दरम्यान, काँग्रेसचे माजी मंत्री आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनीही पक्षाला घरचा आहेर दिला आहे. नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे मोठा पेचप्रसंग निर्माण झाला होता. तसेच नवीन अध्यक्षांची निवड झाली नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला सत्तेवरून पायउतार व्हावे लागले. त्यावेळी अनेकांच्या भावना होत्या की, नानाभाऊंनी राजीनामा द्यायला नको हाता. नानाभाऊंनी राजीनामा दिला नसता तर हे सरकार टिकले असते, अशा सर्वांच्या भावना होत्या, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"