Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा अखेर ३८ दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार झाला. यात भाजपच्या ९ आणि शिंदे गटातील ९ आमदारांनी शपथ घेतली. यानंतर आता कोणत्या मंत्र्याला कोणते खाते मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, यातच आता भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना पुढील मंत्रिमंडळ विस्तारात तरी स्थान मिळणार का, यावरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजपवर टीका करताना पंकजा मुंडे यांना एक सल्ला दिला आहे.
शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर भाष्य करताना, अशा चर्चा माध्यमांमधून, माझ्या कार्यकर्त्यांमधून होत असतात. पण त्यांना वाटले असेल की यांची पात्रता नाही, म्हणून दिले नसेल. पण जेव्हा त्यांना वाटेल की पंकजा मुंडेंची पात्रता आहे तेव्हा ते देतील. पण मी शांत आहे, माझे कार्यकर्ते शांत आहेत. या सगळ्यात माझा काही रोल असणार नाही. मी जे काम करते ते स्वाभिमानाने आणि इज्जतीने राजकारण करते, असे पंकजा मुंडे यांनी आवर्जुन सांगितले. यावर एकनाथ खडसे यांनी सल्ला दिला आहे.
मंत्रिमंडळाचा विस्तार अपूर्ण दिसतोय
मंत्रिमंडळाचा विस्तार अपूर्ण दिसतोय. पुढच्या कालखंडात आणखी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. गोपीनाथ मुंडे यांच्या परिवाराशी जे कुणी संबंधित आहेत, पंकजा मुंडे असो वा इतर त्यांच्याव सातत्याने अन्याय केला जात आहे. आताही पंकजाताईंना मंत्रिमंडळात घेतील की नाही याबाबत शंका आहे. पंकजा मुंडे यांना माझ्या शुभेच्छा आहेत. आता त्यांनी अजून वाट न पाहता वरिष्ठांना भेटावे, असा सल्ला एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडेंना दिला.
दरम्यान, पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडेंच्या विचारांचा वारसा चालवत आहेत. असे असताना देखील त्यांना मंत्रिपदाबाबत सातत्याने डावलले जात आहे. त्यांना मंत्रिपद मिळावे ही सर्वांचीच इच्छा असते पण शेवटी भाजप पक्षाचा अंतर्गत विषय असल्याचे म्हणत आमदार सचिन अहिर यांनी भाजपवर खोचक टीका केली आहे.