“अजित पवार नक्कीच मुख्यमंत्री होऊ शकतात”; एकनाथ खडसेंनी मांडले राजकीय गणित
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 12:38 PM2023-04-23T12:38:50+5:302023-04-23T12:39:47+5:30
Maharashtra Politics: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अजित पवार यांना राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.
Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेकविध प्रतिक्रिया उमटल्या. शिंदे गटातील नेत्यांनी अजित पवारांचे स्वागत करू, असे म्हटले आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अजित पवार मुख्यमंत्री कसे होऊ शकतात, याबाबत राजकीय गणित मांडले.
एकनाथ खडसे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय येणार याचा अंदाज कोणालाही नाही. न्यायालयाचा निकाल आला आणि हे १६ आमदार अपात्र ठरले तर काय परिस्थिती निर्माण होईल. विशेष म्हणजे या १६ आमदारांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही नाव आहे. त्यामुळे आपोआप राज्यातील सरकार कोलमडेल. त्यामुळे ज्यांच्याकडे सर्वधिक बहुमत आहे त्यांना राज्यपालांना बोलवावेच लागणार. एक क्षणात त्यांना राष्ट्रपती राजवट लावता येणार नाही. मग अशा परिस्थितीत जो काही आकड्यांचा खेळ होईल, त्यात महाविकास आघाडीने अजित पवारांना नेतृत्व करण्याची संधी दिल्यास ते मुख्यमंत्री का होऊ शकत नाही, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले.
अजित पवार पक्ष सोडून भाजपमध्ये जातील असे मला वाटत नाही
अजित पवार पक्ष सोडून भाजपमध्ये जातील, असे मला वाटत नाही. या पक्षात त्यांना मान आहे, सन्मान आहे. अनेकदा उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. तसेच वर्षोनुवर्षे त्यांनी या पक्षात काम करुन पक्ष उभा केला आहे. त्यामुळे अशा धमक्यांना भीक घालून ते भाजपसोबत जातील असे मला वाटत नाही, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे आमच्या मनातील मुख्यमंत्री आहेत. सध्याच्या आमच्या युतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे हेदेखील चांगले नेते आहे. पण आमच्या मनातील मुख्यमंत्री फडणवीस हेच आहेत, असे विधान भाजप नेते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले आहे. या विधानामुळे पुन्हा एकदा राज्यात चर्चांना उधाण आल्याचे सांगितले जात आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"