Maharashtra Politics: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक ट्विट करत खळबळ उडवून दिली. १५-१६ आमदार अपात्र ठरणार आहेत. अजित पवार भाजपसोबत जाणार आहेत, तेही लवकरच असा मोठा दावा अंजली दमानिया यांनी केला होता. यावरून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले. यासंदर्भात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली.
मी मंत्रालयात गेले होते तेव्हा तिथे एक चांगले पत्रकार माझ्या ओळखीचे आहेत. ते भेटले होते. त्यांनी तुम्हाला काही सांगायचे असे असे म्हटले होते. यावेळी त्यांनी अजित पवार हे विरोधी पक्षाच्या भूमिकेत बिलकुल दिसत नाहीएत. त्यांची आणि भाजपाची नक्कीच जवळीक दिसतेय. हे १५-१६ आमदार बाद होणार आहेत, अजित पवार भाजपासोबत जाणार आहेत, असे सांगितले. मी त्यांना तेव्हा मग काय करायचे, असे विचारले आणि पुढच्या कामाला निघून गेले, असे दमानिया यांनी सांगितले. यानंतर दावे-प्रतिदावे सुरू झाले. याप्रकरणी एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली.
अजितदादांशी बोलणे झाले, ते म्हणाले...
माझे अजित पवार यांच्याशी बोलणं झाले आहे. दादा कुठेही जाणार नाही. त्यांना बदनाम करण्याचे काम सुरू आहे, असे एकनाथ खडसे म्हणाले. खडसे यांच्या या विधानाने अजितदादा भाजपसोबत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असल्याचे बोलले जात आहे. तसेच अजितदादा भाजपमध्ये जाण्याचा कोणताही प्रश्न उद्भवत नाही. ते कोणत्याही परिस्थितीत पक्ष सोडणार नाहीत, असेही खडसे यांनी सांगितले. दुसरीकडे, बाबरी आंदोलनातील शिवसैनिकांच्या सहभागावर बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, शिवसैनिक कमी संख्येने होते. बाबरीचा ढाचा आम्ही पाडला असे म्हणण्याची हिंमत तेव्हा कोणी दाखवली नाही. मात्र, माझ्या शिवसैनिकांनी ढाचा पाडला असेल तर मला त्याचा अभिमान आहे, असे बाळासाहेब ठाकरे यांनीच म्हटले होते. त्यामुळे शिवसैनिकांकडे बोट दाखवणे योग्य नाही, असा खडसे म्हणाले.
दरम्यान, याप्रकरणी खुद्द अजित पवार यांनी भाष्य केले आहे. भाजपबरोबर जाणार या अंजली दमानियांच्या दाव्यावर अजित पवार म्हणाले की, एवढ्या मोठ्या व्यक्तीबद्दल माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता काय सांगणार आहे. तर ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात नाव नसल्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार यांनी सांगितले की, मला आणि सुनेत्रा पवार यांना जरंडेश्वर कारखाना प्रकरणात ईडीकडून क्लीनचिट मिळाल्याच्या बातमीत अजिबात तथ्य नाही. ती चौकशी सुरू आहे. त्यात कुठल्याही प्रकारची क्लीनचिट मिळालेली नाही. ही बातमी कशाच्या आधारे दिली हे मला कळायला मार्ग नाही, पण मी सर्वांना स्पष्ट सांगू इच्छितो की, अशाप्रकारची क्लीनचिट मिळालेली नाही, असे अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"