Maharashtra Politics: “मविआ सरकारमध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता, पण...”; नाथाभाऊंनी सांगितली ‘मन की बात’
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 04:07 PM2022-10-12T16:07:39+5:302022-10-12T16:08:49+5:30
Maharashtra Politics: चमत्कार घडवणारे महापुरुष शरद पवार आपल्यासोबत असून, राष्ट्रवादी हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे एकनाथ खडसे म्हणाले.
Maharashtra Politics: सध्या राज्यात अनेकविध मुद्द्यांवरून राजकारण तापलेले पाहायला मिळत आहे. यातच अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक जाहीर झाल्याने यासाठी शिवसेना, भाजप आणि शिंदे गटाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला पाठिंबा दिला आहे. मात्र, या घडामोडीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केलेल्या एका विधानावरून राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्याचे सांगितले जात आहे.
एकनाथ खडसे यांनी जळगावमध्ये बोलताना, महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत यायच्यावेळी साधारण दोन-तीन आमदार आपल्याकडे अधिक असते, तर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता, असा दावा करत, महाविकास आघाडी असेल तरी आपण आपला पक्ष मजबूत केला पाहिजे. संघटन वाढवले पाहिजे. जनसंपर्क वाढवला पाहिजे. आपले अधिकाधिक उमेदवार कसे निवडून येतील तिथे लक्ष दिले पाहिजे. राष्ट्रवादी हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन एकनाथ खडसे यांनी कार्यकर्त्यांना केले.
महापुरुष शरद पवार आपल्यासोबत आहेत
आपला मित्र पक्ष मजबूत असला तरी आपणही मजबूत असू शकतो. महाविकास आघाडी पक्षातील घटक हा मजबूत असला पाहिजे. तीन पक्ष मिळून हे सरकार येऊ शकत हे शरद पवारांनी करून दाखवले होते. त्यामुळे आपला पक्ष मजबूत करण्यावर भर द्यावा. शिंदे सरकार येईल असे वाटले नव्हते. आपलेही तीन पक्षाचे सरकारी येईल, असेही वाटले नव्हते. मात्र चमत्कार करणारा महापुरुष शरद पवार आपल्यासोबत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा आपले सरकार राज्यामध्ये येणार, असे भाकित एकनाथ खडसे यांनी केले.
दरम्यान, महाराष्ट्रात महाविकास आघाडीने एकत्र निवडणुका लढवल्या. तीन पक्ष मिळून एकत्र लढावे लागेल. घोडा मैदान जवळ आलेय. त्यामुळे तयारीला लागा, असे आवाहन खडसेंनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"