Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ४० आमदार आणि १२ खासदारांसह बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेला मोठे भगदाड पडले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) प्रचंड सक्रीय झाले असून, राज्यभर दौरे सुरू आहेत. यातच एकनाथ शिंदे गटाला राज्यातून प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे. आता मात्र, एकनाथ शिंदे गटाने आपला मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळवल्याचे चित्र असून, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर आता एकनाथ खडसेंनी बंडखोरांवर बोचरी टीका केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या तब्बल ४० आमदारांसह बंडखोरी केल्यानंतर या आमदारांवर विविध आरोप करण्यात आले. बंडखोरीसाठी या आमदारांना प्रत्येकी ५० कोटी रुपये देण्यात आल्याचा दावा महाविकास आघाडीतील काही नेत्यांकडून करण्यात आला होता. याच दाव्याचा पुनरुच्चार करत एकनाथ खडसे यांनी बंडखोरांवर खरमरीत शब्दांत निशाणा साधला आहे.
तुम्हाला काय हाटील, काय झाडी जे काही बघायचे असेल ते बघा
यांच्या बापजाद्याने कधी ५० खोके पाहिले नसतील. तुम्हाला काय हाटील, काय झाडी जे काही बघायचे असेल ते बघा. मात्र जनतेला वाऱ्यावर सोडू नका, असा टोला एकनाथ खडसे यांनी लगावला. एक मुख्यमंत्री तर दुसरा बिनखात्याचा उपमुख्यमंत्री आहे. मंत्रिमंडळ विस्तारावरून गेल्या ३७ दिवसांपासून सरकारचा पोरखेळपणा सुरू आहे, अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली.
दरम्यान, नुकत्याच रावेर मतदारसंघात झालेल्या ग्रामंपचायत निवडणूकीत चार ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला. एकनाथ खडसेंनी वर्चस्व सिद्ध केले आहे. मात्र, हा आनंद फारकाळ टिकला नाही. शिंदे गटात सहभागी असलेले अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसेंना मोठा धक्का दिला आहे. नाथाभाऊंचा बालेकिल्ला असलेल्या बोदवड तालुक्यातील राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला.