राष्ट्रवादीची शिवसेनेवर कुरघोडी, मंत्रिपदं मिळवण्यात आघाडी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2019 10:01 AM2019-12-04T10:01:18+5:302019-12-04T10:03:09+5:30
अनेक महत्त्वाची खाती स्वत:कडे ठेवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न
मुंबई: महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादीनं सर्वाधिक मंत्रिपदं पदरात पाडून घेण्यात यश मिळवलं आहे. मंत्रिमंडळातल्या एकूण ४३ मंत्रिपदांपैकी १६ मंत्रिपदं मिळवण्यात राष्ट्रवादीला यश आलं आहे. यामध्ये उपमुख्यमंत्रीपदाचादेखील समावेश आहे. याशिवाय इतरही महत्त्वाची खाती स्वत:कडे ठेवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. त्यामुळे नव्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचा वरचष्मा असेल.
महाराष्ट्र विकास आघाडीच्या मंत्रिमंडळात शिवसेनेकडे १५ मंत्रिपदं असतील. तर राष्ट्रवादीकडे १६ आणि काँग्रेसकडे १२ मंत्रिपदांची जबाबदारी असेल. गेल्याच आठवड्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर काँग्रेसच्या नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्ष म्हणून सूत्रं स्वीकारली. त्यामुळे आता राष्ट्रवादी उपमुख्यमंत्रिपदं कोणाला देणार याबद्दल मोठी उत्सुकता आहे. बंडखोरी करणाऱ्या अजित पवारांची उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लागणार की शरद पवार त्यांना बाजूला सारुन दुसऱ्या नेत्याला संधी देणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
नव्या मंत्रिमंडळात शिवसेनेला १५ मंत्रिपदं मिळतील. यामध्ये १२ कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्रिपदांचा समावेश असू शकतो. तर राष्ट्रवादीला १० कॅबिनेट आणि ६ राज्यमंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला ८ कॅबिनेट आणि ४ राज्यमंत्रिपदं मिळू शकतात. मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे असलं तरी राष्ट्रवादी अनेक महत्त्वाची मंत्रिपदं स्वत:कडे ठेवू शकते. २००४ मध्येदेखील राष्ट्रवादीनं अशाच प्रकारे अनेक महत्त्वपूर्ण खाती घेतली होती. त्यावेळी निवडणुकीत राष्ट्रवादीला ७१, तर काँग्रेसला ६९ जागांवर यश मिळालं होतं. काँग्रेसपेक्षा जास्त उमेदवार निवडून आल्यानं पक्षानं मुख्यमंत्रिपदावर दावा करावा, अशी राष्ट्रवादीतील अनेकांची इच्छा होती. मात्र राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी मुख्यमंत्रिपदावर पाणी सोडून अनेक महत्त्वाची खाती मिळवली होती.