मुंबई : आघाडी सरकारमधील सामाजिक न्याय विभागाचे राज्य मंत्री संजय सावकारे आणि मुरबाडचे (जि.ठाणे) आमदार किसन कथोरे यांनी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. सावकारे हे भुसावळ या अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या मतदारसंघाचे आमदार आहेत. तेथील राष्ट्रवादीचे नेते संतोष चौधरी यांचे ते निकटवर्ती असल्यामुळे २००९ मध्ये त्यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली होती.तथापि, नंतर दोघांमध्ये कमालीचे वितुष्ट आले. त्यातच खडसे यांनी सावकारे यांना भाजपामध्ये आणण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. ते भुसावळमध्ये भाजपाचे उमेदवार असू शकतील. भाजपामध्ये प्रवेश करताना आज त्यांनी राज्यमंत्रीपदाचा, आमदारकीचा आणि राष्ट्रवादीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. भाजपा-शिवसेना युतीमध्ये भुसावळची जागा ही शिवसेनेच्या वाट्याला असताना सावकारे यांनी भाजपात जाणे पसंत केले. युतीमध्ये वितुष्ट गेल्याकाही दिवसात आढत असल्याच्या पार्श्वभुमिवर भाजपाने त्यांना आपल्या तंबूत आणले आणि उद्या त्यांना उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा आज आहे. कथोरे यांचे ठाणे जिल्ह्णाच्या राजकारणातील राष्ट्रवादीचे प्रभावी नेते पालकमंत्री गणेश नाईक, मंत्री जितेंद्र आव्हाड आणि सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांच्याशी मतभेद होते. त्यांच्याकडून कोंडी असल्याची तक्रार त्यांनी अनेकदा प्रदेश नेतृत्वाकडे केली होती पण त्याची दखल घेण्यात आली नाही, ही त्यांची नाराजी होती. (विशेष प्रतिनिधी)
राष्ट्रवादी काँग्रेसला दोन धक्के
By admin | Published: September 23, 2014 4:48 AM