मुंबई - लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठ्या प्रमाणात गळती लागली. अनेक दिग्गज नेत्यांनी घड्याळ काढून कमळ हाती घेणे पसंत केले. यामुळे राष्ट्रवादीकडे सहाजिकच विधानसभेसाठी तगड्या उमेदवारांची कमतरता निर्माण झाली. या संकटावर मात करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार स्वत: मैदानात उतरले. महाराष्ट्र दौरा काढून शरद पवार यांनी उमेदवारांची घोषणा करण्यास सुरुवात केली आहे. मात्र उमेदवारांची घोषणा करताना शरद पवार जुनंच सूत्र वापरताना दिसत आहेत.
शरद पवार यांनी नुकतेच बीड जिल्ह्यातील पाच मतदार संघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यामध्ये चार उमेदवार तरुण आहे. यामध्ये धनंजय मुंडे, विजयराजे पंडित, संदीप क्षीरसागर, आणि नमिता मुंदडा हे तरुण आहेत. मात्र यांची निवड करताना पवारांनी पुन्हा एकदा घराणेशाही जपण्याचा प्रयत्न केला आहे.
परळीतून धनंजय मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांना गोपीनाथ मुंडे यांचा वारसा लाभला असला तरी त्यांनी राजकारणात आपली जागा निर्माण केली आहे. विरोधीपक्ष नेता म्हणून त्यांनी चांगले काम केले आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित होतीच. परंतु मुंडे यांची उमेदवारी वगळल्यास उर्वरित तीन उमेदवारांना राजकीय वारसा आहे. किंबहुना घराणेशाहीतून हे उमेदवार समोर आले आहेत.
विजयसिंह पंडित यांचे वडिल आणि बंधु राजकारणात सक्रिय आहेत. अमरसिंह पंडित तर विधान परिषदेवर आमदार आहेत. त्यामुळे त्यांना राजकीय पार्श्वभूमी लाभलेली आहे. तर संदीप क्षीरसागर हे मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे आहेत. तर नमिता मुंदडा या दिवंगत माजी मंत्री विमल मुंदडा यांच्या सूनबाई आहेत. बीडमध्ये उमेदवारी जाहीर झालेल्या चारही उमेदवारांना कौटुंबिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने तरुणांना संधी दिली असली तरी घराणेशाही सोडली नसल्याचे स्पष्ट होते.