'काकां'पासून अंतर, मात्र त्यांच्या गुरूला 'वंदन'; अजितदादांच्या जाहीरनाम्यात यशवंतराव चव्हाणांबाबत मोठं आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 03:19 PM2024-04-22T15:19:31+5:302024-04-22T15:20:55+5:30
राष्ट्रवादीने यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे.
NCP Ajit Pawar ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला जाहीरनामा आज प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात राष्ट्रवादीने घोषणांचा पाऊस पाडला असून राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असणारा भारतरत्न पुरस्कार मिळावा, यासाठी पुढाकार घेणार असल्याचंही म्हटलं आहे. राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी माझा फोटो आपल्या पोस्टर्सवर वापरू नका, असं सांगितल्यानंतर अजित पवारांच्या पक्षाकडून पवार यांच्या जागी यशवंतराव चव्हाण यांचा फोटो वापरला जात आहे. त्यातच आता राष्ट्रवादीने चव्हाण यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे.
यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांच्याकडे राज्याच्या राजकारणात गुरू-शिष्याची जोडी म्हणून पाहिलं जातं. शरद पवारांच्या राजकीय उदयात चव्हाण यांचा मोठा वाटा राहिला आहे. तसंच माझ्या राजकीय जीवनाचा आदर्श हे यशवंतराव चव्हाण हेच असल्याचं शरद पवार वारंवार सांगत असतात. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार यांच्याकडून याच यशवंतराव चव्हाण यांचा फोटो आपल्या पक्षाच्या पोस्टर्सवर वापरून शरद पवार यांना आव्हान दिलं जात आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात कोणकोणती आश्वासने?
जातनिहाय जनगणनेला भाजपचा विरोध असताना महायुतीचा घटकपक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीने मात्र जातनिहाय जनगणनेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असं आश्वासन देण्यात आलं आहे. तसंच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी पाठपुरावा करू, उर्दू शाळांना सेमी इंग्रजीचा दर्जा मिळावा, यासाठी प्रयत्न करणे, शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य एमएसपी मिळणे, अपारंपरिक वीजनिर्मिती करणे, उद्योगांना प्राधान्य, कृषी पिक विम्याच्या व्याप्तीत वाढ, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषेदत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं याकरता पाठिंबा अशी आश्वासने राष्ट्रवादीने दिली आहेत.