मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका व त्याबाबतची सद्य:स्थिती व पूर्वतयारी, जिल्हानिहाय पक्षसंघटना बांधणी आदी विषयांवर राष्ट्रवादी पक्षाच्या राज्यस्तरीय बैठकीत चर्चा झाल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात ही बैठक झाली, बैठकीत भीषण दुष्काळामुळे निर्माण झालेली परिस्थिती चारा, पाणी, दुष्काळी कामांचा प्रश्न यावरही चर्चा झाली.बैठकीस विधिमंडळ पक्षनेते आ. अजित पवार, उपनेते जयदत्त क्षीरसागर, विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, ज्येष्ठ नेते आ. छगन भुजबळ, माजी खा. पद्मसिंह पाटील, गणेश नाईक, आ. जयंत पाटील, आ. जितेंद्र आव्हाड, मुंबई विभागीय अध्यक्ष सचिन अहिर, मुख्य प्रवक्ता नवाब मलिक, खा. सुप्रिया सुळे, राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ, कोषाध्यक्ष आ. हेमंत टकले आदींसह पक्षाचे प्रमुख नेते, सर्व जिल्हाध्यक्ष, सर्व आजी-माजी आमदार व खासदार, प्रदेश पदाधिकारी व निरीक्षक, फ्रंटल संघटनांचे पदाधिकारी, पक्षाचे सर्व जिल्हाध्यक्ष, सर्व नगरसेवक, महापौर, उपमहापौर, समिती सभापती, नगराध्यक्ष, जि.प. अध्यक्ष, पंचायत समिती सभापती, लोकसभा-विधानसभा निवडणुकीतील पक्षाचे सर्व उमेदवार, जिल्हा सहकारी बँक, सहकारी साखर कारखाना, जिल्हा दूध संघ व मार्केट कमिटीचे चेअरमन उपस्थित होते.या बैठकीत छगन भुजबळ यांनी दुष्काळासंबंधी व्हॉटस अॅपवर फिरणारी एक कविताही वाचून दाखविली. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना तटकरे म्हणाले, आजच्या बैठकीत राज्यातील दुष्काळी परिस्थितीसंदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केला. सरकारमध्ये राहून काही नेते लोकांमध्ये सरकारवर आगपाखड करीत आहेत. एकीकडे सरकारमध्ये राहून फायदे घ्यायचे आणि जनतेचे प्रश्न मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित न करता लोकांमध्ये जाऊन वेगळे बोलायचे या दुटप्पी भूमिकेला आमचा विरोध आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राज्याचे मंत्री दुष्काळी जिल्ह्याच्या दौऱ्यावर जात आहेत. इतके महिने लोटल्यानंतर मंत्री दुष्काळदौऱ्यावर जात असतील तर हे दुर्दैवच म्हणावे लागेल. (प्रतिनिधी)
राष्ट्रवादीने घेतली पक्षबांधणीची बैठक
By admin | Published: February 28, 2016 2:04 AM