मुंबई - राज्यात नुकत्याच स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्यात आले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद विभागून मिळू शकत होते. मात्र राष्ट्रवादीने तस न करता सर्वाधिक मंत्रीपदं घेतली आहेत. याचा लाभ राष्ट्रवादीला पक्ष विस्तारासाठी होणार हे नक्की.
सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदावर दावा करण्यासाठी वाव असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपद डावलले आहे. आघाडीच्या काळात राष्ट्रवादीला विधानसभेला काँग्रेसच्या तुलनेत अधिक जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळेल हे निश्चित मानले जात होते. मात्र त्यावेळी देखील राष्ट्रवादीने अधिकची मंत्रीपदं घेऊन वाटाघाटी केली होती. त्यामुळे अजित पवार नाराज झाले होते.
आता पुन्हा एकदा अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद मिळत असताना शरद पवारांनीउद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याच आग्रह केला. त्यामुळे नाईलाजाने उद्धव य़ांना मुख्यमंत्री व्हावे लागले. या संदर्भात विचारले असता, पवार म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावे यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत एकमत होते. तसेच आघाडीच्या काळात राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपद न घेण्यामागे पक्षविस्तार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्रीपद न घेता अधिकची मंत्रीपदं घेण्यावर त्यावेळी आमचा भर होता. जेणेकरून राज्यातील विविध भागात पक्षविस्तारासाठी मदत होणार होती. आता महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतरही पवार यांनी अडीच वर्षांसाठी मिळत असलेले मुख्यमंत्रीपद नाकारले आहे. महाविकास आघाडीत राष्ट्रवादीला सर्वाधिक 16, शिवसेनेला 15 आणि काँग्रेसला 12 मंत्रीपद मिळणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने पुन्हा एकदा पक्षविस्तारासाठी पावले उचलली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.