ऑनलाइन लोकमत
तासगाव, दि. १५ - राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार व आर.आर. पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांनी भरघोस मताधिक्य मिळवत तासगावचा गड कायम राखला आहे. सुमनताई पाटील यांनी भाजपाचे बंडखोर उमेदवार स्वप्निल पाटील यांचा १ लाख १२ हजार मतांनी पराभव केला आहे. स्वप्निल पाटील यांचे डिपोझिटही जप्त झाले आहे.
आर. आर. पाटील यांच्या निधनाने तासगाव कवठेमहाकाळ विधानसभा मतदारसंघातील जागा रिक्त झाली होती. तासगावमध्ये ११ एप्रिल रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले. राष्ट्रवादीने आर.आर. पाटील यांची पत्नी सुमनताई पाटील यांना उमेदवारी दिली होती. भाजपा व अन्य कोणत्याही मोठ्या पक्षाने सुमनताई पाटील यांच्याविरोधात उमेदवार दिला नव्हता. तर स्वप्निल पाटील हे भाजपातून बंडखोरी करत अपक्ष म्हणून रिंगणात उतरले होते. एकूण ८ अपक्ष उमेदवारांचे सुमनताई पाटील यांच्यासमोर आव्हान होते. ११ एप्रिलरोजी झालेल्या मतदानात ५८.७४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
बुधवारी झालेल्या मतमोजणीत तासगावचा गड राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले. सुमनताई पाटील यांनी तब्बल १ लाख ३१ ९२७ मतं मिळवून पक्षाला विक्रमी विजय मिळवून दिला. स्वप्निल पाटील यांना अवघी १८ हजार २७३ मतंच मिळाली.