Maratha Reservation: जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर राज्य सरकारने मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी दाखले देण्याबाबत शासन निर्णय जारी केला. जरांगे यांना उपोषण मागे घेण्याची लेखी विनंती करण्यात आली आहे. मात्र, सरसकट सर्वांना असा उल्लेख नसल्याने मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेण्यास नकार दिला आहे. यातच राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
आंदोलकांवर हल्ला कोणी करायला लावला? हे शोधणारी यंत्रणा आमच्याकडे नाही. आम्हाला शंका आहे. गृहमंत्री यांना माहिती नसेल किंवा पोलीस सरकारच ऐकत नसेल तर सरकारचा अर्थ काय? नियंत्रण नसणारी फोर्स आहे. महाराष्ट्रात लाठी हल्ला कोणी केला. न्यायाधीश समिती नेमून चौकशी करा, आमची मागणी आहे. अजून उपोषण सुरू आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांना जायला काय हरकत होती? दहीहंडीला भेट देण्यापेक्षा जरंगे पाटील यांना भेटले असते तर बरे झाले असते. त्यामुळे सरकारचा वचक राहिलेला नाही, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.
मंत्र्यांवर अशा पद्धतीने काही फेकणे चुकीचे आहे
मराठा आरक्षणासह धनगर आरक्षणाची मागणी जोर धरू लागली आहे. सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर धनगर आंदोलकांनी भंडारा उधळला. त्यावर बोलताना, एखाद्या मंत्र्यांवर अशा पद्धतीने काही फेकणे चुकीचे आहे, ते एका राज्याचे मंत्री आहेत. शिष्टमंडळानेही त्यांचे म्हणणे मांडले पाहिजे होते. असे जर होत असेल तर कुठलाही मंत्री ऐकून घ्यायला तयार होणार नाही, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून जीवाची बाजी लावून अंतरवाली सराटी येथे आंदोलन केले जात आहे. महाराष्ट्रातील मराठा समाजातील युवकांनी टोकाचे पाऊल उचलू नये, आंदोलनाला हिंसक वळण देऊ नये, शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे. गुन्हे दाखल झाले तर शिक्षणाला आणि नोकरीला अडचण येईल. सर्वांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करावे, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले.