Maharashtra Political Crisis: राज्यभरातून एकनाथ शिंदे गटाला (Eknath Shinde) वाढता पाठिंबा शिवसेनेसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पक्ष आणि संघटना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. यातच आता शिवसेनेने संभाजी ब्रिगेडशी युती करत शिंदे गटासमोर नवे आव्हान उभे केल्याची चर्चा आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही कंबर कसली असून, शिवसेनेतील बंडखोर आमदारांना टार्गेट करून त्याचा वापर आपल्या फायद्यासाठी करून घेण्याची नवी रणनीति आखल्याचे सांगितले जात आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे हे प्लॅनिंग शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मदत करण्यासाठी आहे की, डाव उलटवण्यासाठी आहे, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्याचे सांगितले जात आहे.
एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार आणि १२ खासदारांसह मोठे बंड पुकारले. यावेळी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षावर अनेक आरोप करण्यात आले. यातील मुख्य रोख राष्ट्रवादी काँग्रेसवर होता. शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांवर शिवसेनेचे खच्चीकरण केल्याचा दावा करण्यात आला होता. यातच आता उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना धडा शिकवण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस पुढाकार घेणार आहे. या माध्यमातून स्वपक्षाचा फायदा करून घेण्यासाठीही राष्ट्रवादी काँग्रेसने यासाठी खास रणनीती आखल्याचे सांगितले जात आहे.
बंडखोर आमदारांविरोधात रान उठवण्याचे आदेश
शिवसेना सोडल्यामुळे स्थानिक कार्यकर्ते आणि जनतेच्या मनात बंडखोर आमदारांविषयी काहीशी नाराजी आणि संभ्रमाचे वातावरण आहे. याचाच फायदा उठवत शिवसेनेच्या बंडखोर आमदारांविरोधात रान उठवण्याचे आदेश प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. जनतेच्या मनात पक्षांतराबद्दल जागृती निर्माण करा. यामुळे जनतेत त्यांच्याविरुद्ध रोष निर्माण होईल व जनता त्यांना स्वीकारणार नाही. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार निवडून येण्यासाठी या गोष्टीचा फायदा होईल, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, पक्षांतर करणे लोकांना आवडत नाही, त्यातच काही ‘आमिष’ घेऊन गेले असतील तर जनतेला ते अजिबात पसंत पडत नाही, त्याविरुद्ध जनतेत चीड निर्माण होते. त्यामुळे शिवसेनेतून पक्षांतर करून काही आमदार शिंदे गटात गेले आहेत, त्यांनी पक्षांतर कशासाठी केले आहे, त्याचीही सुरु चर्चा आहे. हाच मुद्दा धरुन बंडखोर आमदारांविरोधात रान उठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्याच्या राजकारणात '५० खोके, एकदम ओके' या सत्ताधाऱ्यांविरोधातील महाविकास आघाडीच्या घोषणेने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. आता याच घोषणेचे 'टी शर्ट' वाटून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीकडून प्रचार करण्यात येणार आहे.