मुंबई - २०१४ साली अशोक चव्हाण यांची एकनाथ शिंदे यांनी भेट घेऊन शिवसेना - कॉंग्रेस आघाडीबाबत चर्चा केली असा अशोक चव्हाण यांनी गौप्यस्फोट केला असेल तर त्यात तथ्य असणे स्वाभाविक आहे असे मत व्यक्त करतानाच सध्या मुख्यमंत्र्यांनी जी युती केली आहे ती कशासाठी केली हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (NCP Jayant Patil) यांनी लगावला.
पंकजाताईं मुंडे यांना भाजप म्हणावे तितके महत्त्व देत नाही हे स्पष्ट झाले आहे. त्यांना थोडंसं बाजूला काढण्यात आले आहे. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी महाराष्ट्रात भाजप वाढवण्यासाठी मोठे कष्ट घेतले. मुंडे साहेबांना मानणारा एक मोठा वर्ग आहे, पंकजाताई मुंडे यांनाही तो वर्ग पाठिंबा देतो. त्यामुळे त्यांचे महत्त्व कमी करण्याचे काम मागील काही वर्षात सुरू आहे म्हणून त्यांनी आपले मत खंत म्हणून व्यक्त केले आहे असेही जयंत पाटील म्हणाले.
मराठा समाजाबद्दलचे तानाजी सावंतांचे वक्तव्य तीच भूमिका मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची...
मराठा तरुणांबद्दल आणि समाजाबद्दल मंत्री तानाजी सावंत यांनी वक्तव्य केले ते अत्यंत धक्कादायक आहे. तीच भूमिका मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची आहे फक्त ते मांडत नाहीत तानाजी सावंत ते मांडत आहेत असा टोला जयंत पाटील यांनी यावेळी लगावला.
आता मुख्यमंत्र्यांनी सगळ्या मंत्र्यांना कमी बोलण्यास सांगितले असले तरी माणसाचा स्वभाव जात नाही इथे तर वेगवेगळ्या स्वभावाचे लोक एकत्र झाले आहेत. आता एकनाथ शिंदे यांनी सांगितले तरी माईक समोर आल्यावर मनातल्या सगळ्या गोष्टी व्यक्त करण्याची प्रथा आणि इच्छा बर्याच जणांची जागृत होताना दिसते असा खोचक टोलाही जयंत पाटील यांनी तानाजी सावंत यांना लगावला.
गॅसचा व्यवसाय मोदी सरकार करतंय
सुरुवातीला मोदीसरकारकडून सर्वांना गॅस सिलेंडर वापरण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले त्यानंतर सर्वांनी सिलेंडर घेतल्यावर सबसिडी कमी करण्यात आली म्हणजे गॅसचा व्यवसाय मोदी सरकार करतंय असं वाटायला लागले आहे असा हल्लाबोल जयंत पाटील यांनी केला.
आता सिलेंडर वापरावर बंधन आणणे म्हणजे खुल्या बाजारात जो दर असेल (उदाहरणार्थ दोन - अडीच हजार रुपये ) त्याच दरात जनतेने गॅस सिलेंडर खरेदी करावा लागणार आहे असा त्याचा अर्थ आहे मात्र या सरकारच्या धोरणामुळे सर्वसामान्य जनतेला व मध्यमवर्गीय नागरिकांना फार मोठी किंमत मोजावी लागणार आहे असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.
नितीन गडकरी यांनी खरे बोलण्यापेक्षा वस्तुस्थितीचं केले वर्णन
नितीन गडकरी यांनी खरे बोलण्यापेक्षा वस्तुस्थितीचं वर्णन केले आहे. देशात ज्याच्याकडे भांडवल जास्त आहे त्याला महत्व प्राप्त झाले आहे. श्रीमंत लोकांची संख्या मूठभर आहे आणि गरीब लोकांची संख्या प्रचंड मोठी आहे. आपल्या देशाची संपत्ती ठराविक लोकांच्यामध्ये वाटली गेली आहे. देशातील फार मोठा वर्ग हा संपत्तीपासून लांब राहिला आहे त्यामुळे श्रीमंत आणि गरीब याच्यातील दरी ही मागच्या काळात जेवढी होती ती मागील सात - आठ वर्षांत वाढलेली दिसत आहे. असा निष्कर्ष अनेक अर्थतज्ज्ञांनी काढला आहे तेच पुन्हा नितीन गडकरी आपल्या भाषणात आणि वक्तव्यातून बोलत आहेत असेही मत जयंत पाटील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना व्यक्त केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"