मुंबई: मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अलीकडील पुण्यातील सभेत बोलताना जनतेला उद्देशून एक पत्र देणार असून, ते राज्यभरात पोहोचले पाहिजे, अशा सूचना मनसैनिकांना केल्या होत्या. त्यानुसार, गुरुवारी राज ठाकरे यांनी ते पत्र दिले. यानंतर आता पुन्हा एकदा राज ठाकरे आणि मनसेवर निशाणा साधण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यातील मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी राज ठाकरे यांना पत्रावरून टोला लगावला आहे.
राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यासंदर्भात एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. मनसैनिकांनी हे पत्रक घराघरापर्यंत पोहोचवावे, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले होते. यावरून जयंत पाटील यांनी मनसेला डिवचले आहे. राज ठाकरे यांचा मनसे हा पक्ष घराघरापर्यंत पोहोचेल इतका काही मोठा नाही. त्यांनी जे पत्रक काढले आहे, ते कुठपर्यंत पोहोचते, त्याला कशाप्रकारे प्रतिसाद मिळतो, हे पाहून बोलेन, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता आहे
भाजपने राज्यसभेसाठी तिसरा उमेदवार उभा केला आहे. त्यामुळे घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. भाजपला तो घोडेबाजार अपेक्षित नसावा, अशी खात्री आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ते निर्णय घेतील, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. तसेच तिन्ही पक्षाची महाविकास आघाडी आहे, त्यामुळे एकत्र निवडणूका लढणार आहोत. मतदान १० जूनला आहे. त्यामुळे बराच वेळ आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, मशिदींवरील भोंग्यांच्या विषय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उचलल्यानंतर राज्यातीलच नव्हे तर देशातील राजकारण ढवळून निघाले. आता हा विषय आपल्याला कायमचा संपवायचा आहे, असे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नागरिकांसाठी दोन पानी पत्र तयार केले आहे. मनसे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे पत्र घरोघरी पोहचविण्याची मोहीम आखण्यात आली आहे. भोंग्यांविरोधात सुरू केलेल्या आंदोलनाचा पुढचा भाग म्हणून राज ठाकरे यांनी हे पत्र लिहिले आहे. स्वाक्षरी मोहीम, भोंग्यांविरोधात पोलिसांकडे तक्रार करणे अशा माध्यमातून अधिकाधिक नागरिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन राज यांनी या पत्रात केले आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषेत हे पत्र तयार करण्यात आले आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांना हे पत्र घराघरांत पाठवण्याची सूचना करताना कोणीही यात कुचराई करू नये, असा सज्जड दमही राज ठाकरे यांनी दिला आहे.