कोल्हापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी महाविकास आघाडीच्या सरकारमधून (Maha Vikas Aghadi) बाहेर पडण्याचा निर्णय अलीकडेच जाहीर केला. त्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटल्या. यातच आता राष्ट्रवादी पक्षाकडून राजू शेट्टी बाहेर पडल्यासंदर्भात प्रतिक्रिया आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी यासंदर्भात भाष्य केले आहे. राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीतून बाहेर जाण्याचे कोणतेही कारण नव्हते, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना जयंत पाटील म्हणाले की, राजू शेट्टी यांना बाहेर पडण्याचे कोणते कारण वाटतेय माहिती नाही. एखादी गोष्ट मला किंवा कोणत्याही मंत्र्यांना सांगितली आणि त्यांच्या कामांना नकार दिला असेही काही झालेले आठवत नाही. त्यामुळे राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीतून बाहेर जाण्याची आवश्यकता नाही. त्यांनी तशी घोषणा केली असली तरी त्यांनी महाविकास आघाडीसोबतच राहावे, अशी इच्छा जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
देशात शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लक्ष घालावे हे अभिप्रेत आहे
देशात व राज्यात भाजप शेतकऱ्यांना चिरडत आहे. शेतकरी ट्रॅक्टर वापरतो त्याचेही दर वाढले आहेत. पेट्रोलचे दर वाढले आहेत. या सगळ्या गोष्टी शेतकरीविरोधी आहेत. त्यामुळे राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीसोबत राहून याचा प्रतिवाद करायला हवा. यासाठी सर्व पक्षांची ताकद घेऊन देशात शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी त्यांनी लक्ष घालावे हे अभिप्रेत आहे, असे जयंत पाटील म्हणाले. तसेच आमचे सरकार आल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या काळात जेवढी मदत केली आहे ती यापूर्वी कधीच झाली नाही, असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे.
दरम्यान, आमच्या सरकारने कार्यकाळ सुरू करताच दोन लाखांपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. कोरोना काळातदेखील शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने आम्ही विसरलो नाही. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात ५० हजार रुपयांपर्यंत नियमित कर्ज भरले आहे त्यांना अनुदान देण्याचा निर्णय घोषित केला आहे त्याची अंमलबजावणी यावर्षी होणार आहे, असे जयंत पाटील यांनी नमूद केले.