Jayant Patil News: विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी विविध मुद्द्यांवरून विरोधी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्ताधारी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. तसेच विधिमंडळातील विविध नेत्यांच्या भेटी-गाठीही चर्चेच्या विषय ठरल्या. यातच आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीपदाबाबत पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. याबाबत संजय राऊतांनी केलेल्या एका विधानावर महाविकास आघाडी तसेच महायुतीचे नेते प्रतिक्रिया देत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी याबाबत सकारात्मक भाष्य केल्याची चर्चा सुरू आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित केला पाहिजे. मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरे जाणे धोका आहे. महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून राज्याने उद्धव ठाकरेंचे काम पाहिले आहे. लोकसभा निवडणुकीत झालेले मतदान हे उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहूनही झालेले आहे. अर्थातच तिघांचीही ताकद एकत्र होती. बिन चेहऱ्याचे सरकार, हे अजिबात चालणार नाही. लोक ते स्वीकारणार नाहीत. लोकांना चेहरा द्यावाच लागेल, असे संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले. यावरून आता जयंत पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी फार चांगले काम केले
मुख्यमंत्रिपदाबाबत महाविकास आघाडीच्या बैठकीत बसून चर्चा करून निर्णय होणे आवश्यक आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही. प्रत्येक पक्ष त्यांच्याकडून एखादे नाव पुढे करू शकतो. त्यावर बसून चर्चा होईल. महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते त्यावर बसून चर्चा करतील आणि निर्णय घेतील. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलायचे झाल्यास ते आमच्या सरकारचे प्रमुख होते. महाविकास आघाडीचे राज्यात सरकार असताना उद्धव ठाकरे त्या सरकारचे मुख्यमंत्री होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी फार चांगले काम केले, असे जयंत पाटील म्हणाले.
दरम्यान, या संदर्भातील निर्णय एकत्र बसून घेऊ. मविआच्या बैठकीत जो काही फॉर्म्युला ठरेल तो अंतिम असणार आहे. संजय राऊत यांचे वैयक्तिक मत असेल. महाविकास आघाडी चर्चा करुन काय ते ठरवेल, असे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. तर, ही लढाई मुख्यमंत्रीपदाची नाही. ही लढाई स्वाभिमानाची आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणाले.