Andheri Bypoll 2022: आगामी महापालिका निवडणुका आणि आताची अंधेरी पूर्वची पोटनिवडणुकीवरून शिवसेना आणि भाजप-शिंदे गटातील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसत आहे. यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून भाजपने पोटनिवडणूक लढवू नये, असे आवाहन केले होते. याला प्रतिसाद देत भाजपने मुरजी पटेल यांची उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. यावरून आता विरोधकांकडून भाजपवर टीका होताना दिसत आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला आपला पराभव स्पष्ट दिसत होता. त्यामुळेच भाजपने माघार घेतली, असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी लगावला.
भाजपचे महाराष्ट्र प्रभारी सी.टी. रवि आणि मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्यात बैठक झाली. या बैठकीनंतर भाजपने उमेदवारी मागे घेतल्याचा निर्णय जाहीर केला आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा अर्ज परत घेत आहे. ऋतुजा लटके या निवडून याव्या यासाठी अर्ज परत घेत आहोत, असे भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सांगितले. यानंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपवर टीका करण्यात येत आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपला पराभव दिसत होता
भाजपने जाहीर केलेल्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील म्हणाले की, निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच ऋतुजा लटके उभ्या राहू नये म्हणून प्रयत्न सुरू होते. त्यानंतर त्यांचा राजीनामा मंजूर होऊ नये, यासाठी अनेक अडथळे आणले गेले. शेवटी त्यांना कोर्टात धाव घ्यावी लागली. या सर्वांमुळे अंधेरीत ऋतुजा लटके यांच्या बाजूने वातावरण निर्मिती झाली होती. भाजपाला माहिती होते की, इथे आपला पराभव होणार आहे. पराभवाची खात्री झाल्यानंतर भाजपाने निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.
दरम्यान, अंधेरी पोटनिवडणुकीसंदर्भात उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'मेघदूत' बंगल्यावर रविवारी रात्री उशिरा बैठक झाली. या बैठकीला आशिष शेलार आणि भाजप उमेदवार मुरजी पटेल उपस्थित होते. मुरजी पटेल हे निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ठाम होते. आपली पूर्ण तयारी झाल्याचे पटेल यांनी सांगितले. तर आशिष शेलार यांचाही पोटनिवडणूक लढवण्याचा आग्रह होता. मात्र, अखेर सी. टी. राव यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर भाजपने उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे, आता, ऋतुजा लटके यांचा विजय सोपा झाल्याचे सांगितले जात आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"