Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबतची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. बंडखोरी करण्यात आलेल्या आमदारांपैकी १६ आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. तसेच शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. शिंदे-फडणवीस यांचे सरकार कोसळण्याबाबत अनेक तारखा, भाकिते करण्यात आली आहेत. यातच महाविकास आघाडीचा घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदे-फडणवीस सरकार जास्त काळ टिकणार नाही, आपल्या विचारांचे सरकार लवकरच येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीमुळे सध्या सर्व राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार सुरु आहे. त्यानिमित्ताने अनेक नेत्यांचे दौरे आता विविध भागात सुरु आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकार कोसळ्याबाबत भाष्य केले आहे. ज्या दिवशी या सरकारवर अपात्रतेची कारवाई होईल त्या दिवशी हे सरकार पडणार आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या डोक्यावर अपात्रेची टांगती तलवार आहे, असेही पाटील यांनी सांगितले.
हेही सरकार कधीही कोसळेल
महाविकास आघाडीचे सरकार असताना शिवसेनेचे आमदार फुटले त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यामुळे या शिंदे गटातील आमदारांवर जर अपात्रतेची कारवाई झाली तर हेही सरकार कधीही कोसळेल आणि आपल्या विचारांचे सरकार येणार असल्याचा विश्वास जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
दरम्यान, लोकसभा आणि विधानसभा एकत्रच होईल, असा अंदाज आहे. त्यामुळेच आम्ही कामाला लागलो आहोत. अलीकडे अनेक घटक एकत्र येऊन चर्चा करत आहेत. २०२४ मध्ये आजच्याप्रमाणे निराशाजनक चित्र नसेल. लोक आता हुशार झालेत. आपण मतदान केलेल्या नेत्याने पक्षबदल केल्यावर त्या नेत्यालाच लोक मनातून काढून टाकतात. त्यामुळे आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येईल आणि फडणवीसांसाठी आमच्याकडून सरप्राइज असेल, असे जयंत पाटील म्हणाले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"