Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून केलेल्या अभूतपूर्व बंडाळीनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले. भाजपने सक्रीय होत सगळी सूत्रे आपल्या हातात घेतली आणि शिंदे गटाला पाठिंबा दर्शवत नवे सरकार स्थापन केले. यानंतर आता नवे शिंदे-फडणवीस सरकार कोसळण्याबाबत नवनवे दावे आणि भाकिते केली जात आहे. शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्ष सर्वोच्च न्यायालयात पोहोचला असून, लवकरच पाच सदस्यीय घटनापीठासमोर यासंदर्भातील याचिकांची सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे सरकार कोसळले, असे भाकित केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे सरकार पडणारच! आता मध्यावधी निवडणुका होतील की नाही हे माहित नाही पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सरकार पडणार आणि मग मध्यावधी निवडणुका लागतील. जर मध्यावधी निवडणुका लागल्या तर आम्ही सगळेजण निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी तयार आहोत, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
शिंदे गटाला सोबत घेत सत्तेत बसलेलं लोकांना पटलेले नाही
मध्यावधी निवडणुका लागल्यास भाजप आणि शिंदे गटाला त तितकेसे सोपे जाणार नाही. कारण लोकांना प्रामणिक मुख्यमंत्री पाहायची सवय लागली आहे. त्या लोकांचा सध्या अपेक्षा भंग झाला आहे. सन २०२४ ला पुन्हा निवडणूक लढतो आणि पुन्हा सत्तेत येतो, असे भाजपने म्हटले असते तरी लोकांनी त्यांना स्विकारले असते. पण आता महाविकास आघाडीचे सरकार पाडून शिंदे गटाला सोबत घेत सत्तेत बसलेले लोकांना पटलेले नाही. त्यामुळे त्याचे परिणाम निवडणुकीत दिसतील, असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे.
दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले तेव्हा कोट्यावधींच्या देवाणघेवाण झाली. हे सगळे महाराष्ट्रातील जनतेला पटेल, रुचेल असे वाटत नाही. शिंदे गटालील आमदारांचे पुढच्या टर्मला निवडूण येणे कठीण आहे, असे जयंत पाटील म्हणाले. तत्पूर्वी काही दिवसांआधी मध्यावधी निवडणुका लागतील का? असा प्रश्न राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना विचारण्यात आला होता. तेव्हा सरकार पडेल आणि निवडणुका लागतील हे सांगायला ज्योतिषी नाही. निवडणुका कधीही लागल्या तरी आम्ही तयार आहोत. नाही लागल्या तरी विरोधी पक्ष म्हणून आम्ही आमची जबाबदारी पार पाडणार आहोत, असे शरद पवार म्हणाले होते.