मुंबई - उत्साहाच्या भरात महाराष्ट्र जिंकण्याचा दावा करणे चुकीचे असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (NCP Jayant Patil) यांनी माध्यमांशी बोलताना भाजपाला लगावला आहे. उत्तर प्रदेशमध्ये मायावतींना मतं अधिक पडली आहेत. सर्व पक्ष उत्तर प्रदेशमध्ये एकवटले असते तर विजय झाला असता असा दावा करतानाच भाजपच्या हातातूनही अनेक राज्य गेली होती याची आठवणही जयंत पाटील यांनी करुन दिली.
महाराष्ट्राची मानसिकता वेगळी आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला धोका नाही असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई करायला हरकत नाही परंतु भाजपमधील लोकांवरही कारवाई व्हावी. आम्ही भाजपची यादी दिली आहे कारवाई व्हावी असे जाहीर आव्हानही जयंत पाटील यांनी दिले. देश चालवायची जी चुकीची पद्धत आहे त्याचा विरोध करायला हवा त्यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला हवे असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.
"जंगजंग पछाडूनही महाविकास आघाडी पडत नाही हे भाजपच्या लक्षात आले"
जंगजंग पछाडूनही महाविकास आघाडी पडत नाही हे भाजपच्या लक्षात आले आहे असा जोरदार टोलाही जयंत पाटील यांनी लगावला. गोव्यात आमचे फारसे नेतृत्व नव्हते. आम्ही काँग्रेस सोबत येईल याची वाट पाहत होतो असेही जयंत पाटील यांनी गोव्यातील पराभवावर भाष्य केले. यंत्रणांवर दबाव आणण्याचे कारण नाही पण ६ वाजता समन्स न देता नवाब मलिक यांना घेऊन गेले याची आठवण करून देतानाच आता केंद्रीय यंत्रणा आक्रमक होतील की पक्ष हे पाहावे लागेल असा स्पष्ट इशाराही जयंत पाटील यांनी यावेळी दिला.