मुंबई- राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन शेवटाकडे येताना जोरदार तापलं आहे. आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. बुधवारी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर झालेल्या जोरदार राड्यानंतर वातावरण अजूनच जास्त तापलेलं आहे. आज देखील विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपा आणि शिंदे गटाचे आमदारांनी घोषणाबाजी केली. आदित्य ठाकरे यांना शिंदे गटाकडून लक्ष्य करण्यात आलं. बॅनरसह विधीमंडळाच्या पायऱ्यांवर शिंदे गटातील आमदारांकडून घोषणाबाजी करण्यात आली. आदित्य ठाकरेंविरोधात शिंदे गटातील आमदारांनी '५० खोके...मातोश्री ओके', '५० खोके...मुंबई मनपा ओके', 'युवराजांची दिशा नेहमीच चुकली', अशा घोषणा देखील दिल्या. यानंतर राष्ट्रवादीने राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
"राज्य सरकार सैरभैर अवस्थेत, सगळाच सावळा गोंधळ; संवेदनशील विषयावर सरकारची अनास्था" असं म्हणत निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी टीकास्त्र सोडलं आहे. "राज्य सरकार सैरभैर अवस्थेत आहे. कुपोषणावरील चर्चेत आरोग्य मंत्र्यांचे उत्तर आदिवासी मंत्री वाचून दाखवतात. आदिवासी मंत्र्यांनी दिलेल्या चुकीच्या आकडेवारीला वनमंत्री संरक्षण देतात. सगळाच सावळा गोंधळ. राज्यातील कुपोषित बालकांचा मृत्यू या संवेदनशील विषयावर सरकारची अनास्था अधोरेखित होते" असं म्हटलं आहे.
"थातुरमातुर उत्तरे देऊन आदिवासी विकास मंत्री महत्वाच्या घटकाची थट्टा करतात"
जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "कुपोषणासारखा अत्यंत संवेदनशील मुद्दा सत्ताधाऱ्यांकडून सभागृहात रेटून नेला जातो. थातुरमातुर उत्तरे देऊन आदिवासी विकास मंत्री राज्यातील महत्वाच्या घटकाची थट्टा करतात. इतर मंत्री त्यांची पाठराखण करतात. हा प्रकार निंदनीय आहे" असं देखील जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच याआधी अतिवृष्टीने ग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना पहिल्यांदा दिलासा द्या, सरकार म्हणतंय मदत करतो मात्र मदत अद्याप कागदावरच आहे. सरकारचे बोलणेच जास्त आणि कामात शून्य आहे असा जोरदार टोला लगावला होता.
"सरकार शेतकऱ्यांना मदत करतंय मात्र कागदावरच"
सरकार स्थिर करण्यात, नाराजांची मनधरणी करण्यात, खाते वाटून घेण्यात हे व्यस्त आहेत त्यामुळे शेतकऱ्यांकडे, सामान्य जनतेकडे यांचे दुर्लक्ष आहे असा आरोपही जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केला होता. मूळ प्रश्नाकडे बगल देण्यासाठी सिंचन चौकशीच्या वावड्या उठवल्या जात आहेत. १५ वर्षे जुन्या गोष्टी उकरून काढून विरोधकांना बदनाम करण्याची ही चाल आहे. सध्याच्या सरकारचे ते कामच आहे मात्र आम्ही काही घाबरत नाही, आम्ही विरोधक म्हणून आपली जबाबदारी पार पाडू असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला होता.