Jayant Patil vs Eknath Shinde: "छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लूटली... त्या सुरतेला तुम्ही शरण व्हायला गेलात... तुमची सुरतेवर स्वारी झाली परंतु त्याने महाराष्ट्राची बदनामीच झाली", अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शिंदे गटाला खडे बोल सुनावले. अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना आणि मंत्र्यांना चिमटे काढले. तसेच, सत्ताधाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर सडकून टीका केली.
जयंत पाटील यांनी नव्या सरकारमधील काही मंत्र्यांची आणि अद्याप न होऊ शकलेल्या मंत्र्यांची खिल्ली उडवली. "८० टक्के मार्क मिळालेल्यांनी २० टक्के मार्क असलेल्या लोकांना पाठिंबा दिला. चिमणआबा तुम्ही गुवाहाटीत पहिल्या लॉटमध्ये गेलात... ससा आणि कासवाची कथा तुम्हाला माहीत आहे. गुलाबराव पाटील उशिरा आले आणि पहिले मंत्री झाले. चिमणआबा मात्र पाठीमागे राहिले व मंत्री झालेच नाहीत. यांच्यासाठी कोणते मेरीट लावले? गुलाबरावांना मंत्री केलं त्याला विरोध नाही पण चिमणआबा काय झाले तुमचे... शिरसाटांना मंत्री का केले नाही आता कसं अडजेस्ट करणार त्यांना... संघाचे काम नाना किती वर्ष केलं तुम्ही... नानांची निष्ठेची टोपी बाहेर ठेवली गेली आणि कॉंग्रेसकडून आलेल्या सत्तारांना मंत्री केले.. नानांसारख्या ज्येष्ठ माणसाचा विचार का केला नाही.. दादा भुसे चांगले कृषी मंत्री म्हणून काम केलं असताना त्यांनाही वेगळंच खातं दिलं", अशी खोचक विधाने जयंत पाटलांनी केली.
"खातेवाटपात काय झालं ते आपण सगळ्यांनी पाहिलंच. चंद्रकांत पाटील यांच्यावर केवढा अन्याय.. या मंत्रीमंडळात एकच ध्रुवतारा तो म्हणजे गुलाबराव पाटील... त्यांचे पाणी पुरवठा खाते कुणी बदलले नाही... शंभुराजे देसाई यांना एक्साईज खातं दिलं... ते खातं गणेश नाईक यांच्याकडे होते त्यामुळे तुम्हाला ते चांगलं वाटणार नाही मंदाताई यांना चांगलं माहिती आहे. बच्चू कडू सध्या अडीच वर्षे सह्यांवर दिवस काढतील असं वाटतं. मुख्यमंत्री दिलेला शब्द पाळणार पण कधी पाळणार? हल्ली तुम्हाला घेरलेले आहे. त्यामुळे त्यांना कॅबिनेट मंत्री करा असं मला वाटतं", असेही ते म्हणाले.
"आमचीच युती अनैसर्गिक कशी?"
निवडणुका झाल्यावर युती होते परंतु आमची झाली ती अनैसर्गिक युती कशी काय? या आधीही बाळासाहेब ठाकरे यांनी प्रतिभाताई यांना राष्ट्रपती निवडणुकीत पाठिंबा दिला होता. प्रणव मुखर्जी यांच्या वेळी पाठिंबा दिला होता. ज्यावेळी महाराष्ट्राला गरज होती, तेव्हा शिवसेना सत्याच्या बाजूने उभी राहिली. आता शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस ही अनैसर्गिक युती होती असं बोलता. आमच्या बरोबर होता त्यावेळी असा शब्द काढला नाही. भाजपसोबत युती नैसर्गिक युती आणि आमच्या सोबत अनैसर्गिक युती हे कसं काय?", असा प्रश्न त्यांनी भाजपा आणि शिंदे गटाला विचारला.