Eknath Shinde vs Jayant Patil: सरपंच, नगराध्यक्ष पदासाठी थेट निवडणुक घेण्यासंबंधीचे विधेयक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात मांडले. यावर बोलताना माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला. "महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकासमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनीच हे विधेयक अस्तित्वात येणे कसे चूक आहे यासाठी वकिली केली होती. त्यावेळी त्यांचा उत्साह इतका होता की आम्हीही प्रभावित होऊन त्यांच्या सूचनेला पाठिंबा दिला. त्यांनी इतकी चांगली वकिली केली की देवेंद्र फडणवीसही त्यांना विरोध करू शकले नाही. आज ते पुन्हा सांगत आहेत की थेट जनतेतून सरपंच, नगराध्यक्ष निवडायचे. एवढ्या कमी कालावधीत एखाद्याचे मत परिवर्तन कसे होऊ शकते?", असा टोला जयंत पाटील यांनी आज सभागृहात एकनाथ शिंदे यांना लगावला.
"मी कधी काम सांगितले आणि ते काम एकनाथ शिंदे यांनी कधी नाकारलं आहे असं झालं नाही त्यामुळे 'थेट नगराध्यक्ष' निवडीच्या या विधेयकावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फेरविचार करतील असा मला विश्वास आहे. या विधेयकामुळे नगरपालिकेच्या कामकाजात मोठा गोंधळ निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. बऱ्याच नगरपालिका अशा आहेत ज्या ठिकाणी नगराध्यक्ष एका पक्षाचे आणि सदस्यांची बहुसंख्या विरोधी पक्षाची. यामुळे अनेक निर्णय होत नाही, प्रयत्न करून घेतला तरी त्या निर्णयांची अंमलबजावणी होत नाही आणि नगरपालिकेचे कामकाज ठप्प होते त्यामुळे अपप्रवृत्ती वाढीस लागेल", अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
"थेट नगराध्यक्ष निवडण्याचा प्रयोग याआधीही राज्यात केला गेला होता मात्र त्याचे अत्यंत वाईट अनुभव राज्यातील विविध भागात आले. त्यामुळे मागच्या सरकारचे नगरविकास मंत्री यांनी तो निर्णय चुकीचा ठरवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माझी विनंती आहे की त्यांनी या विधेयकावर पुन्हा एकदा विचार करावा. या विधेयकाला स्थगिती द्या. आपल्याला समर्थन असणाऱ्या सदस्यांना खाजगीत विचारले तर त्यांचाही या विधेयकाला विरोध असेल. या विधेयकामुळे नगरपालिकेची गती खुंटते, विरोधाभासामुळे निधी परत जातो", असेही जयंत पाटील यांनी निदर्शनास आणून दिले.