मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. जयंत पाटील यांनी ट्विट करून आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती दिली आहे. यासोबतच त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना देखील कोरोना चाचणी करण्याची विनंती केली असून आपली प्रकृती उत्तम असल्याचं म्हटलं आहे.
जयंत पाटील यांनी गुरुवारी (१८ फेब्रुवारी) रोजी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे मात्र तब्येत उत्तम आहे, काळजी करण्यासारखे काही नाही. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेत आहे, लवकरच प्रत्यक्षात आपल्या सेवेत रुजू होईल. आपण माझ्या संपर्कात आले असल्यास, आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती करतो. जितकं कामकाज व्हर्च्युअली करणे शक्य होईल सध्या तितके करण्याचा प्रयत्न करतो आहे" असं म्हटलं आहे.
काही दिवसांपूर्वी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर अनिल देशमुख नागपूरमधील रुग्णालयात उपचार घेत आहेत. महाराष्ट्रात ७ लाख ४० हजार ८३१ (८.२ टक्के) कोरोना योद्ध्यांचे लसीकरण झाले आहे. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र हा दुसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
कोरोनाविरोधात लढणाऱ्या देशभरातील ८८ लाख ५७ हजार ३४१ कोरोना योद्ध्यांना लस देण्यात आली आहे. यातील १ लाख ३४ हजार ६९१ लसी या मंगळवारी लावण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे लसीकरण अभियानात उत्तर प्रदेशसह महाराष्ट्र आघाडीवर आहे. उत्तर प्रदेशात आतापर्यंत ९ लाख ३४ हजार ९६२ (१०.४ टक्के) लसीकरण करण्यात आले.