आव्हाडांकडून हसन मुश्रीफांचा एकेरी उल्लेख; अजित पवार गटाचा जोरदार पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2023 11:18 AM2023-12-24T11:18:25+5:302023-12-24T11:20:49+5:30
जितेेंद्र आव्हाडांच्या टीकेला अजित पवार गटाकडून ठाण्यातील नेते आणि माजी खासदार आनंद परांजपे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
Jitendra Awhad NCP ( Marathi News ) : राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गटामध्ये राजकीय संघर्ष सुरू असून दिवसेंदिवस हा संघर्ष टोक गाठत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड हे आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात. नुकतंच आव्हाड यांनी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घणाघाती टीका केली होती. या टीकेला अजित पवार गटाकडून ठाण्यातील नेते आणि माजी खासदार आनंद परांजपे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
"राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एकेरी भाषेत टीका केली. आव्हाड यांची ही संस्कृती आहे. अनेकदा ते एकेरी भाषेत टीका करून लोकांचा अपमान करत असतात. मात्र हसन मुश्रीफ हे कोल्हापूरच्या लाल मातीतून येतात, पैलवानही आहेत. ते कधी तुम्हाला राजकारणात चितपट करतील, हे तुम्हाला कळणारही नाही," असा पलटवार आनंद परांजपे यांनी केला आहे.
५३ आमदारांच्या पत्रावरूनही खोचक टोला
भाजपला समर्थन देण्यासाठी राष्ट्रवादीच्या ५३ आमदारांनी सह्यांचं पत्र दिलं होतं. मात्र अजित पवारांच्या दबावात मी सही केली आणि नंतर बाहेर येऊन जयंत पाटील यांना सांगितलं की, माझी सही ग्राह्य धरू नका, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. या दाव्यावरूनही आनंद परांजपे यांनी आव्हाडांवर निशाणा साधला. "तुम्ही कोणी लहान मूल होतात का? तुमच्या हात धरून कोणी जबरदस्तीने ती सही घेतली होती का?" असा सवाल परांजपे यांनी उपस्थित केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ यांचा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एकेरी भाषेत उल्लेख केला. त्यांच्या या वक्तव्यावर पार्टीचे प्रदेश प्रवक्ते माजी खा. आनंद परांजपे यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांना सडेतोड प्रत्युत्तर केले.… pic.twitter.com/svpRXSsrLP
— MahaNCPspeaks (@mahancpspeaks) December 23, 2023
दरम्यान, आनंद परांजपे यांनी केलेल्या या टीकेवर जितेंद्र आव्हाड काही भाष्य करतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.