मुंबई - राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नावे फेक अकाऊंट सुरू करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर आव्हाडांच्या प्रोफाईलवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो पाहायला मिळत आहे. मात्र हे आव्हाड यांचं अधिकृत अकाऊंट नसल्याची माहिती आता समोर आली आहे. आव्हाडांनीच आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतची माहिती दिली आहे. याचा एक फोटो ट्विट करून त्यांनी हे अकाऊंट फेक असल्याचं म्हटलं आहे.
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्या फेक अकाऊंटचा फोटो आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. तसेच "हे फेक अकाऊंट असून त्याचा चुकीचा वापर केला जात आहे. या फेक अकाऊंटची तक्रार आपण मुंबई पोलीस, मुंबई पोलीस आयुक्त, महाराष्ट्र सायबर सेल, ठाणे पोलिसांकडे तक्रार केली आहे" असं ट्विट त्यांनी केलं आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी मुंबई पोलिसांची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियावर तयार करण्यात आलेल्या 80 हजार बनावट अकाऊंटविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बनावट अकाउंटवरून मुंबई पोलिसांची बदनामी
फेक अकाऊंटमध्ये ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुकवरच्या अकाऊंट्सचा समावेश आहे. लवकरच या कटामागील आरोपींवर कारवाई करणार असल्याचे सायबर पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी सांगितलं आहे. या बनावट अकाउंटवरून मुंबई पोलिसांची बदनामी, शिवीगाळ करण्यात येत होती. विशेष म्हणजे, पोलीस आयुक्तालयाच्या नावेही बनावट अकाऊंट काढले होते. काही वृत्तसंस्थांनीही चुकीच्या पद्धतीने तपास दाखवून पोलिसांची बदनामी केली. त्याविरुद्ध काही निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालय योग्य भूमिका घेईल, असं पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सांगितलं आहे.
महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करणारे “मराठी भैय्ये” आता माफी मागणार का?; जितेंद्र आव्हाड कडाडले
अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात एम्सचा अहवाल आल्यानंतर आता सत्ताधारी नेत्यांकडून विरोधी पक्षाच्या नेत्यांवर टीका करणं सुरू आहे. सुशांत सिंह प्रकरणाचा तपास मुंबई पोलील दबावाखाली करत असून कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकार करतंय असा आरोप करण्यात येत होता. जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी या प्रकरणावरुन भाजपा नेत्यांना टार्गेट केलं होतं. 'सुशांत प्रकरणात काही न्यूज चॅनेल्स,मराठी भैय्ये आणि BJPच्या नेत्यांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलिसांची नाहक बदनामी केली.आता CBIने मान्य केलं आहे की,सुशांतने आत्महत्याच केलीय. महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करणारे "मराठी भैय्ये" आता माफी मागणार का?' असा सवाल करत आव्हाडांनी भाजपा नेत्यांना घेरलं होतं.